बालपणी ची दिवाळी
दिवाळी शब्दच किती छान आहे . शब्दातच उत्साह भरलेला आहे असे मला वाटते. लहान असतांना तर जास्तच अप्रूप होतं दिवाळीचे. आता काळाच्या ओघात ते कमी झाले...
बालपणीची दिवाळी....
लहानपणी ची दिवाळी म्हटले की अनेक विचारांची डोक्यात गर्दी होते.
माझा जन्म व बालपण मुंबईतले, आजोळ देखील मुंबईत च त्यामुळे दिवाळी म्हटले की मला आठवते शाळेला लागणारी दिवाळीची सुट्टी..
दिवाळीचा अभ्यास...
सुट्टी लागली की पहिल्या दिवशीच दोन वेगळ्या वह्या करायच्या, सुलेखन व इतर दिवसानुसार अभ्यास.. अभ्यास दररोज करण्यापेक्षा एकदाच पूर्ण करायचा, मग खेळायला वेळ मोकळा.
वाणसामान घरी आलेले असायचे. ते निवडणे, साफ करणे, ऊन दाखवणे अशी आईची कामे सुरु असत, त्यात मदत करायची.
आप्पा (वडील ) कापड घेऊन यायचे, त्यात तिघींचे फ्रॉक आई शिवायची. कापड सारखेच असले तरी त्यांची वेगवेगळी फॅशन करून आई शिवत असे, एकीचा उडत्या बाह्याचा, दुसरीचा खूप फुग्या चा, कधी मोठ्या बाह्यांचा,कधी खिसा, कधी फ्रिल असे वेगळे त्यामुळे वेगळाच आनंद मिळे.दादाचा शर्ट पॅन्ट बाहेर शिवायला टाकले जायचे.
संध्याकाळी भाड्याने सायकल आणायची, ती वेळेत तर परत करायची पण अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत चालवायची, दुकानासमोर च दोन चार फेऱ्या मारत राहायचे 😄
कागद,कामट्या आणायच्या,त्या व्यवस्थित तासून कंदील बनवायचा. सोसायटी त कोणाचा चांगला झालाय ते बघत फिरायचे .
मग कुठून तरी किल्ला बनवायची टूम निघे. विटा, माती, पाणी आणत किल्ला बने. आपण च म्हणायचे आमचा हा प्रतापगड, कोणाचा रायगड, विशालगड. प्रत्येक किल्ल्यावर 🚩 पाहिजेच. त्याकरिता कंदीलातून उरलेले कागद, काड्या वापरून झेंडे तयार.
आता अगदी दिवाळी दोन दिवसावर आली की आई बरोबर फराळ बनवायला मदत करायची.सुरुवात नेहमी बेसन लाडू ने, मी आज ही सुरुवात बेसन लाडू ने च करते. आईने कधीच कोणताही पदार्थ मोजून मापून केला नाही, नजरेच्या अंदाजाने सर्व वस्तू घेऊन करत असे. तरी कधीच कुठे चुकत नसे. खुसखुशीत करंजी, चकली, कडबोळी, कुरकुरीत चिवडा, सारे ओळीने डब्यात भरले जायी.
संध्याकाळी मोठा कागद घेऊन उभ्या अडव्या रेघा आखायाच्या. मग उदबत्तीने भोक पाडून रांगोळी करिता कागद तयार करायचा. दारासमोर गेरू लावून चौकोन रंगवून ठेवत असू.
फटाके कोणते आणायचे. ते आणले की आम्ही भावंडे वाटून घेत असू. दादाला ऍटम बॉम्ब,चिमणी, सुतळी बॉम्ब.. ताज महाल, लवंगी आम्हा मुलींना , फुलबाज्या,टिकल्या, अनार, भुचक्र सर्वांचे एकत्र. टिकल्या बत्त्याने फोडताना जी मजा येई ती कधी बंदूकने येत नसे.एक एक लवंगी उदबत्ती ने लावत संध्याकाळ आनंदात!
नरकचतुर्दशी पहाटे कुडकुडत उठून, पाटावर बसून आई कडून तेल, उटणे, अंगाला व नारळाचे दूध केसाला लावून मोती साबण, गरम पाण्याने अंघोळ. सर्वात आनंदाची गोष्ट. प्रत्येकाची अंघोळ सुरु असताना फटाके उडवणे,
नवीन कपडे घालणे नंतर औक्षण व फराळ सौख्याचा परमोच्चं क्षण! त्यादिवशी करंजी ची चव लागे ती इतर वेळेस नाही लागत.
एकीकडे रेडिओवर नरकासुर वधाचे कीर्तन सुरु असे.ठिपक्यांची रांगोळी दाराबाहेर काढली जाई.पणत्या उजळल्या जातं.
समोरच्या काकूंकडे फराळाचे ताट दिले जायी, त्यांच्याकडून आमच्या घरी 😄 त्यांच्या ही दारासमोर रांगोळी आम्ही काढत असू.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन..अनारशाचा नेवैद्य, फटाका्यांचा उत्साह, आवाज, धूर ह्याची वेगळी मजा.
असे चार दिवस मजेत जात,. भाऊबीजेला मामा, मावश्या सगळे येत, बहुतेक वेळेस गोड खाऊन कंटाळा आलाय म्हणत बटाटवडे चा बेत असे, मसालेभात, पंचामृत, दुधीहलवा असे सांग्रसंगीत जेवण होई.
तेव्हा येणारा प्रत्येक जण आपल्या घरचा फराळ घेऊन येई व जाताना आमचा फराळ घेऊन जायी. विकत ची मिठाई किंवा इतर काही सहसा नसे.त्यातून जो आनंद, प्रेम, माया मिळे ते आज काल विकतच्या मिठाया खाऊन मिळत नाही.
आता कोणाकडे घरचा फराळ घेऊन गेलो तर कमी प्रतिष्ठिचे मानले जाईल.
Order केले की कधी ही मिळतो फराळ, त्यामुळे त्यात नावीन्य राहिले नाही.
पण आज ही मनात ही च दिवाळी आहे.
आई अप्पाना सणांच्या वेळेस खूप miss करते....
" तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
..|🏮 शुभ दिपावली 🏮
अर्चना कुलकर्णी.
11/11/2020