Tuesday, 30 January 2024

आरोपीच्या पिंजऱ्यात

 *कल्पतरू जागतिक साहित्य मंच आयोजित काव्यलेखन उपक्रम*


*विषय - आरोपीच्या पिंजऱ्यात*



प्रेम म्हणजे प्रेम असतं...


प्रेम म्हणजे प्रेम असतं

हे म्हणणं फार सोपं असतं

तू मला पाहिलेस,

आणि म्हणे

प्रथमक्षणी प्रेमात पडलास,

होतास तू ही रुबाबदार

चाल होती ऐटबाज

भुलले मग मी ही तुझ्या रुपाला,

भेटू लागलो वारंवार

चोरटे क्षण खुणावू लागले

पुनः पुनः अनुभवावे वाटू लागले,

वेडच जणू तुझे लागले

दिवस रात्रीचा विसर पडला

सदैव तूच दिसू लागला,

सूर्य, चंद्र, तारे

तूच होतास माझे सारे,

का एका क्षणात बदलले सारे?

जेंव्हा कळले तुझ्या घरी

श्रीमंतीची पडली दरी

तूही विसरलास

सारी स्वप्नं, दिलेली वचने

निघून गेलास परदेशी,

न काही सांगता

आज मी उभी आहे,

*आरोपीच्या पिंजऱ्यात*

पोटातील गर्भासवे!



अर्चना कुलकर्णी.

नाशिक.

Sunday, 28 January 2024

चारोळी गजानन


मुषकावरून आले गजानन द्वारी

फुले वाहिली लाल जास्वंदीची 

गळ्यात घालुनी दुर्वांकुर हार 

मोदक नैवेद्याने तृप्त झाली स्वारी .


अर्चना कुलकर्णी.

श्रावणात चाले ऊनसावलीचा खेळ 

कधी सरीवर सरी बरसती 

वृक्षवेलिंवर बहरली फुलं फळं 

हिरव्यागार तणानी सजली धरती!


Sunday, 21 January 2024

सुख

 सुख म्हणजे नक्की काय असतं?


सुख म्हणजे नक्की काय असतं?

सुख हे वयाप्रमाणे बदलत असतं

बालपणी आईच्या गोड पाप्यात असतं

अन बाबांच्या कडेवर बसण्यात असतं!

आई ने प्रेमाने केलेल्या लाडूत दिसतं

बाबांनी आणलेल्या केकमध्ये गवसत!

निरागस मैत्रीत सुख असतं

तर शिक्षकांच्या कौतुकात हसतं!

तारुण्यात सुंदर दिसण्यात सुख वाटते

प्रेम करणारं कोणी भेटले की वाढतं !

योग्य जोडीदार मिळाला की

सुखाच्या सरीत बहरतं

घर स्वतः चे सजवता सुख ही सजतं,

नवऱ्याने गजरा माळताच सुख हसतं,

तर प्रेमाने नवऱ्याला खाऊ घालताच

सुख चेहऱ्यावर विलासतें!

अपत्य आगमनी सुखाची चादर पांघरंत!

त्याच्या प्रत्येक हालचालीत डोळे

सुख पिऊन घेतं!

मुलांचे कौतुक परक्यानी केल्यास

सुख गगनी भिडतं!

सुख हे त्यांच्याभोंवती फिरत राहतं,

वार्धक्य येता मुलं सुजाण नागरिक

असल्याच्या भावनेने सुख हसतं,

ती स्वतः चे विश्व् निर्माण करतात,

ते सुद्धा वेगळे सुख असते,

पावलोपावली सुख हे असं भेटतं!

शोधात त्याच्या न जाता,

संवादत त्याच्याशी आयुष्य सुखात जातं!


अर्चना कुलकर्णी.

Sunday, 14 January 2024

सण मराठी




अर्चना कुलकर्णी … नमस्कार , रसिक मंडळ सहर्ष सदर करीत आहे आपले सण  - आपले उत्सव

सण , उत्सव म्हणजे नक्की काय ? प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल …. प्रत्येकाचा विचार वेगळा असेल …  माझ्यामते  आनंद सामुहिकपणे - सामाजिक स्तरावर साजरा करणे ह्याला उत्सव म्हटले जाते …. मुळात मनुष्य हा समूह्प्रीय प्राणी , त्यात आपल्या हिंदू संस्कृतीत  सणांना ,उत्सवांना विशेष महत्व आहे .
उत्सव आपल्याला आवडतात कारण ते आपल्याला रोजच्या रुटीन मधून थोडा बदल देतात … थोडा आराम … नातेवाईकांच्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी घडवून आणतात , ज्यामुळे मनाला एक वेगळीच प्रसन्नता येते . या  उत्सावामागाची कारणे , भावना जर आपण समजून घेतली  तर येणारे सण यंत्रवत न साजरे होता अधिक चांगल्याप्रकारे साजरे करू शकू . आजच्या ह्या कार्यक्रमातून काही थोड्या सणांची  थोडक्यात ओळख करून देणार  आहोत
चैत्र महिन्याने नवीन  वर्ष सुरु होते ( आसेगावकर कुटुंबीय )
चैत्र शुद्ध प्रतिपदा  -म्हणजेच गुढीपाडवा -- हा हिंदु धर्मियांचा वर्षातील पहिला सण  ह्या दिवशी शालिवाहन शकाची सुरुवात होते. असे म्हणतात की शालिवाहन  राजाने  मातीच्या सैन्यात प्राण भरला व शत्रूवर विजय मिळवला ह्यात खरे तर असे सांगायचे आहे ,जी  प्रजा कणाहीन ,प्राणहीन झाली होती ,त्या प्रजेत नवीन चेतना  जागृत केली व शत्रूवर  विजय मिळवला
या दिवशी रामाने वालीचा वध केला.असा हि उल्लेख आढळतो तसे च
शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
अध्यात्मिक दृष्टीने असे मानतात , ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो.
गुढी उभारण हे विजयाचे प्रतिक मानले जाते .   ह्या दिवशी कडुलिंब व साखर मिश्रण खाण्याचा प्रघात आहे,कडूलिंबाची  कोवळी पाने खाणे आरोग्य चांगले ठेवते . ज्या प्रमाणे  सुरुवातीला कटू वाटणारे अनुभव जीवनात आपल्याला खूप काही शिकवून जातात असे सांगायचे असते …

गाणे -महेश आराध्ये  -  विजयपताका श्रीरामाची झळकते ….
       .
पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो म्हणजेच  वसंत ऋतू सुरू होतो.  या वेळी  उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.स्त्रिया मोठ्या उत्साहाने चैत्रात हळदी- कुंकू करतात …नविन आलेल्या कैरीचे पन्हे , व वाटली डाळ दिली जाते ….

उमा आराध्ये
चैत्र शुद्ध नवमी . श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम  जन्म झाला.हा दिवस रामनवमी म्हणुन साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेतच गाठी पण घालतात.रामज्न्म झाल्यावर फटाके फोडतात.त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात.

श्रीराम नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।' हा नामजप केला जातो

`कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात.याप्रसंगी  त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.

श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) राम जन्माला ग सखे - महेश आराध्ये



श्रीराम भक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला . अनेक मंदिरांमधून  हनुमान जयंती साजरी केली जाते । रामाच्या मंदिराची पूर्णता हनुमानाशिवाय होवू शकत नाही .

अजनीच्या सुत तुला रामाचे वरदान …. एक मुखाने बोल …. उमा


प्रणाली , खरे काकू 

जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.


सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला  यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली.अखेर  यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्याला  वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात.



 सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे.
 वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी

वट वृक्षाला सुती धागा गुंडाळून त्या भोवती फेर्या मारल्या जातात .
 सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.



(वारीतली मुले )


ज्येष्ठानंतर येतो तो आषाढ , आषाढ शुद्ध एकादशीला देव शयनी  एकादशी असे म्हणतात . 


मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या  एकादशीला  उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी' (देवांच्या निद्रेची) एकादशी', असे म्हणतात.
अषाढी एकादशी म्हणजे "देवशयनी एकादशी"...
पण म्हणजे नक्की काय हो? देव शयनी म्हणजे देव ज्या दिवशी निजतात तो दिवस...

आणि कार्तिकी एकादशीला "देवोत्थान एकादशी" म्हणतात, अर्थात देव उठतात तो दिवस...
आता मला सांगा, देव कधी असा निजेल किंवा उठेल का हो?

तर यामागे फ़ार मोठे शास्त्रीय कारण दडलेले आहे!

आपला भारतदेश हा मान्सून पट्ट्यात येणारा! अर्थात इथे चारच महिने पाऊस!

ज्येष्ठ, आखाड , श्रावण आणि भादवा ...

त्यामुळे पेरण्या ज्येष्ठात होतात...
त्या करायच्या आणि एकदा देवाला मनोमन भेटून त्याला निजवून यायचे! अर्थात तिथुन पुढच्या काळात शेतात अधिक कष्ट आवश्यक असल्याने, देवाला विनवायचे की बाबारे, आता मला तुझ्या भजनात, पूजनात अधिक काळ नाही रमता यायचे,
हे चारच महिने मला जरा मोकळीक दे,,,

मी अपार कष्ट करून या ४ महिन्यात पीके उगवेन आणि मग पुन्हा तुला उठवायला येईन!
हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो.महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
पौराणिककाळी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून ''तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल''असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतोव त्याचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळीएकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवासम्हणून करण्याचा प्रघात पडला.
परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र,अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो.हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.

उमा - अवघे गर्जे पंढरपूर ….

९गायत्री आसेगावकर )
ह्यानंतर येते ती गुरुपोर्णिमा ( निखील , सर्वेश ,अखिलेश ) ( दोडे काका ,खरे काकू , नखरे काका , साळवी काकू , सायली )

       आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली.

   आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय.

     आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे.
     भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले,

   पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

  आता  आपल्या परिसरातील काही शिक्षकांना फुल देवून मुले आदर करत आहेत

गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -

  (उमा )गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll





श्रावण महिना  सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच
श्रावण महिन्यातील पहिलामहत्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला.

भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो – `जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दु:खे खाली जाऊ देत.
कालानुरुप समाजाने अनेक विधी, घटना कालबाह्य, थोतांड ठरवल्या. नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, किंबहुन पित असला तरी दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे नैवेद्य म्हणुन दिलेले दुध हे त्यांना मिळतच नाही आणि काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. ह्यासाठीच सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्‍या लोकांवर बंदी घातली. सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची गारूड्यांच्या तावडीतुन सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले.

अर्थात खरे सर्प उपलब्ध नसले तरी बहुतेक ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते. दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवला जातो.

गाणी म्हणून खेळ खेळले जातात .
फुगडी

श्रावण महिन्यात नववधू आपल्या सुखी संसाराकरिता प्रत्येक मंगळवारी पूजा करते , त्याला मंगळागौर असे म्हटले जाते . मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा महेश्वराची पूजा , त्यांची कृपादृष्टी संपादण्यासाठी किंवा त्यांच्या आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने हि पूजा केली जाते .
देवाला पुरणाचा नेवैद्य दाखवला जातो . रात्रभर विविध खेळ खेळून मंगळागौर जागवली जाते . उखाणे ,फुगड्या गाणी , खेळ असे विविध मनोरंजनचे प्रकार असतात .
पूजा - प्रणाली नखरे


चला , आज रात्र जगवायची ग ,

हा सुपारीचा खेळ ,रंगतो जेव्हा जोडीने एकाच दिशेने जायचे ठरवतात तेव्हा , असेच संसाराचे आहे .



घरातली कामे करताना सुद्धा उत्साह उतू जात आहे असे च वाटते  ना ?


स्त्रियांना खेळायला मिळावे ह्या उद्देशाने च हे खेळ खेळले जात असावे , हे छोटे छोटे खेळ मनोरंजन करता करत शरीराला व्यायाम हि देतात ।


.



वाह छान नाव घेतलेस हो प्रणाली ,



खेळ ----- नातू ग्रुप




त्यानंतर येते ती राखीपौर्णिमा  (अमोघ - जान्हवी )…  श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.  या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पूर्वी , जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत समजत असे  , तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ माने , जो तिची रक्षा करील.राजपूत स्त्रिया आपल्या शत्रूंच्या हातात राखी बांधून पुढे होणारा भयंकर संहार टाळीत असत व एकप्रकारे राखीचा उपयोग अहिंसेसाठी करीत असत. आपण आज ह्या सणाकडे बहिण भावाचे प्रेम ह्या नजरेने बघू शकतो. लहानपणी एकत्र खेळलेले बहिण भाऊ , नोकरी निमिताने किंवा बहिण लग्न होवून सासरी गेल्यामुळे नियमित भेटीगाठी होवू शकत नाहीत , अशा वेळेस हे सण भाऊ बहिण यांच्या भेटी घडवून आणतात .
. .
आपल्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले आहे. अशी ही देवतुल्य स्त्री भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून भावाच्या मस्तकातील सद्विचार वं सदबुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष,राग इत्यादींकडे भावाने आपल्या य तिसऱ्या डोळ्याने पहावे य हेतूने बहिण भावाला टिळा लावून त्रिलोचन बनविते. इतका त्या टिळयाचा खोल अर्थ आहे.        तसेच      तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात

राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात.
 सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्वाचे ठरतात.रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे.  रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.      

            द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज धकाधकीच्या जीवनात इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम.
. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे?

     


पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे .  नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि' असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा.


नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा !  हळूहळू समुद्र शांत होतो , व नावाडी आपल्या बोटी पुन्हा पाण्यात सोडतात .
कोळी गीत( मुले )

किती सुंदर झाले हे कोळी नृत्य , ते बसवले होते , मंगला कढणे यांनी ….




ह्यानंतर येते ती गोकुळाष्टमी . श्रीकृष्ण जन्म (समृद्धी कुलकर्णी )
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस   मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत   मध्यरात्री झाला.

गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

गीत . मुकुंद हरी (उमा )

विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला' होय. श्रीकृष्णाने  गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला' हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्‍या क्रियेशी संबंधित आहे. `गोपाळकाला' हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे दर्शन घडवतो .
 सर्वांना  गोपाळ कृष्ण हे एक आदर्श आहे,
त्यावेळीचा तत्कालीन समाज ही आज सारख्या अनेक भुरसटलेल्या कल्पना धरुन बसला होता. तत्कालीन समाज एके दिवशी इंद्र देवाची पुजा करायला निघाला होता त्यावेळी कृष्णांनी त्या
गोपाळांना समजावले की इंद्र वगैरे कोण आपल्याला मदत करणारा काही मदत वगैरे तो करत नाही , खर तर तुम्हाला पुजा करायचीच असेल तर या गोवर्धन पर्वताची करा. कारण हाच पर्वत आपल्या गाई वासरांसाठी चारा देतो त्यामुळेच तर आपण दुधाचा व्यवसाय करतो, या पर्वतामुळेच आपल्याला लाकुडफ़ाटा भेटतो बर्याच ऒषधी वनस्पती हाच पर्वत आपल्याला देत असतो खरच इंद्राच्या परिस हा पर्वत आपली खुप खूप मदत करतो त्यामूळे त्या इंद्राची पुजा करण्यापेक्ष! या पर्वताची पुजा करणे जास्त योग्य होईल. आणी खरच त्या गावातील लोकांनी गोपाळ कृष्णांच ऎकून त्या इंद्राची पुजा करण्यापेक्ष! त्यांनी या गोवर्धन पर्वताची म्हणंजेच पर्यायाने निसर्ग पुजा करायला सुरुवात केली .
या एका गोष्टीतुन कीती तरी गोष्टी शिकायला मिळतात , मला तरी यातुन जाणवलेल्या वा शिकायला मिळालेल्या गोष्टी म्हणजे कोणतीही गोष्ट कारण माहित नसताना चालू ठेवू नये , संघटीतपणे एखादी चांगली गोष्ट सहज शक्य होते .  तसे च निसर्गाचे आपल्यावर असंख्य उपकार आहेत ,त्या निसर्गाचे रक्षण , पूजन करणे हे आपले कर्तव्य आहे .
रात्री १२.००ला कृष्णजन्मोत्सव साजरा झाला की सूर ऐकू येतात ते...
गोSSSविंदा रे गोSSSपाळा... यशोदेच्या तान्ह्या बाळा,
घरात नाही पाणी घागर, उतानी रे गोपाळा...
आला रे आला, गोविंदा आला...
. एकजूटीचा, सांघिकतेचा  संदेश देणारा दहीहंडी  हा खेळ बघायला खूप मजा येते..
सध्या  मात्र  उत्सवाला  व्यापारी स्वरूप  प्राप्‍त   झालेले आहे . पूर्वी छोट्या उंचीवर हंड्या बांधल्या जात होत्या
गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करतांना शास्त्र विसरून निवळ करमणुकीच्या दृष्टीने पहाणे सुरू झाले व या उत्सवाच्या अधोगतीला सुरुवात झाली. उत्सवामुळे संघटित होण्याचा उद्देश विसरून अधिकाधिक स्पर्धा करण्याच्या उद्देशाने मंडळांची व गोविंदा पथकांची संख्या भरमसाट वाढू लागली आहे .(अतिक्ष  भारती )



श्रावण महिन्याचा शेवट चा दिवस  पोळा म्हणून साजरा केला जातो .
. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात, व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्व आहे.या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पिकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकुण आनंदाचे वातावरण असते.या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासुन आराम असतो. . पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण  देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. . या दिवशी बैलाच्या खोंडाला  हळद व तुपाने  शेकले  जाते. त्यांचे पाठीवर सुरेख नक्षिकाम केलेली झूल टाकण्यात येते , सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग , गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य.शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढून त्या पाहूण्याची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते.
या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो.

(सोनाली - अर्चना कुलकर्णी)

 भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात.
या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड “हरित` म्हणजे “हरण` करणे आणि “आलिका` म्हणजे “आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे.
मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे.
  दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले. या व्रताच्या वेळी शिव पार्वती ची पूजा करतात . मनोभावे प्रार्थना करतात. “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात



हा सुंदर गोफ विणला गेला त्याचे श्रेय आहे , सौ . सई नातू यांना … त्या स्वतः खूप उत्कृष्ट मंगळागौरीचे व इतर  खेळ खेळतातच पण इतरांना ही मोठ्या खुबीने शिकवतात

(सोनाली ,मिथुन , देशमुख काका -काकू )

.गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेशमूर्ती चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी.

मूर्तीची  दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरतीच्या शेवटी देवें म्हणतात व प्रसाद वाटतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस साजरा केला जातो. साधारणतः दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते.
 सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे. ‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.’
   गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे फार महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे; गणपतीचा वर्ण लाल आहे.तसेच कोवळ्या दुर्वा गणपतीला व्हायला जातात .  पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते व त्यामुळे मूर्ती जागृत व्हायला मदत होते.

.
गणपतीचा प्रसाद  'मोदक' हे ज्ञानाचे प्रतिक आहे; म्हणून त्याला 'ज्ञानमोदक' असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे); पण अभ्यास करू लागल्यावर समजते की, ज्ञान हे फारच मोठे आहे. (मोदकाचा खालचा भाग हे त्याचे प्रतीक आहे.) मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो.
वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ



आरती- उमा व इतर

रेकॉर्ड - निखिल



गणेशोस्तव नंतर येणारा मोठा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव ( सुप्रिया ,


हिंदु धर्मात भगवतीदेवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात  अश्विन प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आह


नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा हा सण!

पावसाळा संपत आलेला असतो, पीके तयार होत आलेली असतात. काही तयार झालेली असतात. बळीराजा खुशीत असतो.

घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. घटात  दीप हा आदिशक्तीच्या शस्त्रास्त्रांतून निर्माण होणार्‍या तेजाचे प्रतीक म्हणून कार्य करतो. घरात घटपूजन केल्याने वास्तू मध्येही श्री दुर्गादेवीचे चैतन्य कार्यरत होते

  घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. फेर धरुन पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हणतात.




दुर्गे   दुर्घट भारी - उमा
जोगवा
भोंडला


नवरात्रीनंतर येणारा दहावा दिवस म्हणजे च दशहरा किंवा विजयादशमी . ( अखिलेश , सर्वेश )  विजयादशमीच्या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा सण असत्यावर सत्याच्या, अधर्मावर धर्माच्या विजयापित्यर्थ साजरा केला जातो. ह्या सणाबाबत तीन आख्यायिका मांडण्यात येतात,
पहिल्या आख्यायिकेत, जेव्हा महिषासुराने संपूर्ण सृष्टीवर हाहाकार माजविला. धर्म संकटात सापडला, देव-देवादिक, साधू-संत, सामान्य प्रजेचे जगणे मुश्कील झाले. त्यावेळी सर्व देवांनी शिवपत्नी पार्वतीची आराधना केली. पार्वतीने दुर्गेचे रूप धारण करून महिषासुराचा नाश करण्याचे ठरविले. नऊ दिवस चाललेल्या ह्या युद्धाची अखेर दसऱ्याच्या दिवशी महिषासुराच्या वधाने झाली.

दुसऱ्या आख्यायिकेत, रामायणात प्रभू श्रीराम आणि लंकापती रावण यांच्यात माता सीतेच्या अपहरणावरून झालेल्या युद्धाची सांगताही दसऱ्याच्या दिवशीचीच झाली होती. प्रभू श्रीरामाने दसऱ्याच्या दिवशी मावळत्या सूर्याच्या साक्षीने लंकापती रावणाचा वध केला आणि सीता मातेला मुक्त केले. प्रभू श्री रामचंद्रांच्या विजयाच्या आठवणी जगाविण्याकरीता ह्या दिवशी रावण दहनाचेही आयोजन करण्यात येते.
तिसऱ्या आख्यायिकेत, महाभारतात द्यूत क्रीडेत पराभूत झाल्यावर पांडवांना आपले राज्य, सर्व संपत्ती गमवावी लागली होती. एवढेच नव्हे त्यांना वनवासहि भोगावा लागला होता. वनवासादरम्यान त्यांना आपले क्षत्रियत्व लपवावे लागणार होते. त्याकरीता अत्यंत साधी वस्त्र परिधान करून कुठल्याही शस्त्रांशिवाय  पांडव वनवासात गेले. त्यावेळी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवून ठेवली होती. हि शस्त्रे पांडवांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर बाहेर काढून त्यांचे पूजन केले होते. म्हणून दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजनही केले जाते.
दसरा हा सण साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने ह्या दिवशी नवीन कामाचा शुभारंभ, वाहन वा इतर वस्तू खरेदी, सोने खरेदी करण्यासही चांगला मानला जातो. विद्यार्थी ह्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करून विद्याप्राप्तीकारीता आराधानाही करतात. तर सायंकाळी सीमोलंघन करून सोने वाटून म्हणजेच आपट्याची पाने वाटून पारंपारिक पद्धतीने दसरा हा सण साजरा केला जातो.


(अर्चना कुलकर्णी )

(खरे काका काकू , शेंडे कुटुंबीय , अमोघ ,जान्हवी )
दिवाळी सणांची राणी . असे म्हटल्यास वावगे ठरू नये . आपल्या हातात नवीन वर्षाचे कॅलेंडर पडले कि सर्व प्रथम आपण पहातो कि पुढील वर्षी दिवाळी कधी आहे , एवढे ह्या सणांविषयी आपल्या सर्वाना आकर्षण असते . दिवाळी म्हजेच दीपावली , दीप म्हणजे दिवा आवली म्हणजे ओळ …. दिव्यांची रांग ….

दिवाळीची सुरुवात खूप अगोदरपासून होते . नवीन कपडे खरेदी , आकाशकंदील बनवणे , गोड तिखट फराळ बनवणे सुरु असते . 

आश्विन कृष्ण द्वादशी
गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपल्या  संस्कृतीत गो-मातेला फार महत्त्व आहे. ’वसुबारस’  संस्कृतमध्ये यालाच म्हणता गो-वत्स द्वादशी.  या दिवशी  संध्याकाळी दिवेलागणीच्या थोडेसे आधीच साडेपाच-पावणेसहापूर्वीच सर्व गोशाळा (गोठे) स्वच्छ करून रांगोळ्या, तोरणे यांनी सजवून,पणत्या, दीपमाला यांनी प्रकाशित करून मोठ्या प्रेमाने, आदराने आणि भक्तीने गोवंश (गायवासरू) पूजन केले जाते .
या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. घरावर आकाशकंदिल लावतात.  स्त्रीया अंगणातील तुळशीवृंदावनापुढे पणती लावतात..
दिवाळी हा सणच मुळी दिव्यांचा आहे, म्हणून सर्वजण आपापल्या दारासमोर पणत्या लावतात. अंगणांत रांगोळया काढतात या रांगोळया विविध प्रकारच्या असतात. कोणी ठिपक्यांच्या काढून यात आकर्षक रंग भरतात. कोणी फुलांची, तर कोणी धान्याची रांगोळी काढतात. प्रत्येकाच्या दारावर वेगवेगळया आकारातील आकाशकंदिल लावलेले असतात. सुबक रांगोळया, टांगलेले आकाशकंदिल, तेवणार्‍या पणत्या आणि फटाक्यांची, रोषणाई यामुळे सगळे वातावरण उत्साही आणि आनंदी होते.
लहान मुले मातीचे किल्ले बांधतात.

धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिण्याची कृष्ण त्रयोदशी . हा दिवशी लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. तसेच या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.
तसेच समुद्र मंथनातून  दिवशी  धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आले . म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते.  ह्या दिवशी दिव्याची ज्योत दक्षिणेकडे लावली जाते , त्यामुळे अपमृत्यू टळतो  असे मानण्यात येते .

त्यानंतर चा दिवस असतो नरकचतुर्दशी.  श्रीमद्‌भागवतपुराणात अशी एक कथा आहे - `पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करीत होता. देव व मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा हजार उपवर राजकन्यांना तुरुंगात कोंडून ठेवले व त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाकार उडाला. श्रीकृष्णाला ही बातमी समजताच सत्यभामेसह त्याने असुरावर हल्ला केला. नरकासुराला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्‍त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की, `आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.' कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्‍विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले.

उमा - आली माझ्या घरी दिवाळी

अश्विन  अमावास्या हा लक्ष्मी पूजनाचा दिवस होय . . या दिवशी संध्याकाळी  लक्ष्मीसह कुबेराची  पूजा केली जाते .   सर्वत्र दिवे लावले जातात  .साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादि पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्‍तेष्टांना वाटतात. असे मानतात की  आश्‍विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे ती आकर्षित होते.

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे च बलिप्रतिपदा .  बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्‍वरीकार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याचे हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्‍वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते.
 हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे



भाऊबीज-   हा दिवस म्हणजे  कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ह्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे जातो , बहिण त्याला  टिळा  लावून ओवाळते , त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते . भाऊ तिला ओवाळणी म्हणून काही भेट वस्तू देतो . ज्या समाजात भगिनींना समाजातील  पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.





उमा - सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती

मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य  मकर राशीत प्रवेश करतो .  हा सण जानेवारीच्या १४ किंवा १५ तारखेस येतो .
 सुर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होऊन उत्तर गोलार्धात राहणाऱ्या आपण भारतीयांना जास्त प्रकाश व उष्णता मिळण्यास सुरूवात होतो. हा दिवस मोठा होतो व रात्र लहान होत जातो. .
. या उत्सवानिमित्त स्नेह्यांकडे जातात , तिळाचे लाडू देतात , जुने मतभेद , भांडणे विसरून ,नव्याने प्रेम ,आपुलकीने मिसळून जायचे . तीळ  आणि गुळ  दोन्ही पदार्थ अंगात उष्णता निर्माण करतात , ज्याची आपल्याला थंडीत जरुरी असते . नवीन लग्न झालेली स्त्री तिळाच्या हलव्याचे दागिने घालते , व स्त्रियांना हळदीकुंकू देते .त्यामुळे हा स्त्रियांचा सण  असे समजले जाते , वटपौर्णिमा , हरतालिका ,नागपंचमी हे सन आज जरी कालबाह्य वाटत असले तरी त्यामागचे कारण जाणून घेतले कि समजते पूर्वी मुलींची लग्न लवकर होत , ह्या सणानिमित्ताने त्यांना खेळायला मिळे , मैत्रिणींशी हितगुज करता येइ… आज आपण विचार केला तर शहरात एकमेकांकडे जायला वेळ नसतो , तेव्हा असे हळदीकुंकू समारंभानिमित्त एकमेकींशी ओळख होते .  नवीन वसाहतीत राहायला आल्यावर ओळखी होतात ते ह्या सणामुळे …  काही ठिकाणी पतंग उडवण्याची प्रथा  आहे , त्यामागचा उद्देश हि मोकळ्या ठिकाणी जावून सूर्य स्नान व्हावे असा च आहे .






फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होलीकोत्सव  साजरा केला जातो .  उत्सवाचा महत्वाचा भाग म्हणजे होळी पेटविणे. . होळी म्हणजे सर्वांना गारठवुन टाकणार्‍या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणार्‍या अग्नीला कृतज्ञतापुर्वक केलेला प्रणाम. होळी मध्ये फक्त  नकामी वस्तू किंवा  कचरा च नाही तर , मनाला त्रास देणारे वाईट विचार  , मनातला कचरा जाळला पाहिजे . होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे स्वागत. होळीच्या दुसर्या दिवसाला धुळवड असे म्हणतात , तर नंतर येणाऱ्या पंचमीस  रंगपंचमी असे म्हटले जाते . ह्या दिवशी रंग उधळून वसंत ऋतूचे स्वागत केले जाते .



आज गोकुळात - उमा व सहकारी




ह्यानंतर पसायदान म्हणून आमच्या कार्यक्रमाची सांगता करतो .