Tuesday, 27 December 2022

अहवाल

 शिव कॉलनी सेवाभावी संस्थेचे

            साई महिला मंडळ 

इस्कॉन सहल अहवाल...

साई महिला मंडळाची सहल पालघर येथील इस्कॉन, प्रति वृंदावन मंदिर येथे जात आहे, दिनांक १० डिसेंबर २०२२ असे माईंनी सांगितले.आणि आम्हाला खूप आनंद झाला, सगळ्यांची लगबग सुरू झाली.

सहल जायची म्हणुन आमच्या माईनी एक मीटिंग ठरवली व त्यात समिती केली पाच जणाची व त्यात समीतीत काम वाटुन दिली.

नंतर परत मीटिंग घेतली .त्या मिटिंगमध्ये ५० महिला जाणार होत्या त्यांना सहलीला जाताना काय काय नियम आहे व नियमांचे पालन करायचे हे सांगितले व तसेच जर फोन लागला नाहीतर समीतीच्या ज्या प्रमुख होत्या त्याचे नंबर घरच्यांना द्यायला सांगीतले तसेच इस्कॉन मंदिराचे नियमांचे काटेकोर पालन करायचे हेही सांगितले.

ही लगबग आठ दिवस आधी सुरु होती.. आम्ही आतुरतेने वाट बघत होतो.शेवटी सहलीची तारीख आली...

साई महिला मंडळाची सहल,पालघर इस्कॉन प्रति वृंदावन मंदिर येथे निघाली.५० जणी महिला सहलीत सामील झाल्या. सकाळी पाच वाजता हॉलमध्ये सगळ्या महिलांना यायला सांगितलं होते.आम्ही सव्वापाच पर्यत सगळ्या जमलो . टोप्या व बॅज दिले जेणेकरून कोणी कुठे गेले तर टोपीवरून ओळखता येईल.इस्कॉन मंदिराच्या सेविका सौ प्रज्ञा कुलकर्णी ह्यानी सगळ्या महिलांना कपाळाला चंदन व कुंकू लावले. वैष्णव खूण भाळी लागताच एक वेगळी स्फूर्ती मिळाली.

आमची बस सकाळी सहा वाजता आली व रांगेने सर्व महिला बसमध्ये बसल्या. जेष्ठ नगरीक महिला समोरच्या सीटवर नंतर बाकी जणी बसल्या सगळ्या बसल्यानंतर हजेरी घेतली,सगळ्या बसल्या हे पाहून बस सुरु झाली. बसमध्ये बसल्यावर लगेच च चिक्की देण्यात आली.

उत्साहात सर्व जणी भक्तीगीते, व भजन म्हणू लागल्या. 

पहिला टप्पा म्हणजे,सात वाजता त्र्यंबकेश्वर ला गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी थांबली. महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही त्र्यंबक सोडले. आम्हाला मोकळ्या हवेत नास्ता खायचा होता म्हणून एक मोकळी शेताची जागा पाहुन थांबलो, तिथे इस्कॉन तर्फे आमची नाश्त्याची सोय केली मिसळ पाव व फोडणीचे पोहे दिले. गरम कॉफी दिली. सगळ्याच खाऊन झाले व पावणेदहाला परत गाडीत बसलो.

दुपारी दोन वाजता इस्कॉन वृदावन मंदिर मध्ये पोहचलो दोन दोनची जोडी करुन आवारात गेलो. जेवणात भात, पोळी, उसळ व कढी होती.

तिथे जेवणाची वेळ तीन पर्यंत होती अडीच पर्यंत सगळेजण जेवलो.


नंतर सर्व स्थळाना भेट दिली... प्रति वृंदावन म्हणजे...

कृष्ण जन्मापासून विविध प्रकार चे प्रसंग छोट्या छोट्या मूर्ती मधून साकारले होते.पुतना मावशी,कालिया मर्दन, ब्रह्म दर्शन, गोपिकासमवेत रास क्रीडा, असे विविध वृंदावनातील प्रसंग पाहिले, प्रत्येक ठिकाणी प्रभुजी आपल्या रसाळ वाणीतून प्रसंग डोळ्यासमोर उभे करत होते. फिरताना अजिबात त्रास जाणवत नव्हता इतके सर्व कृष्णमय झालो होतो. ते बघत बघत आम्ही फिरलो. शेवटी गोवर्धन पर्वतास पूर्ण प्रदक्षिणा घातली. यमुनेच्या डोहात पाऊल ठेवून पूजन केले.अंघोळ करणे शक्य नसल्याने , विष्णवे नमः म्हणत तीन वेळेस नदीत पाणी सोडले .

मुख्य राधा कृष्ण मंदिरातील मूर्ती इतक्या सुंदर होत्या की तिथून पाय निघत नव्हता. प्रभुपाद स्वामी यांची मूर्ती, विशेषतः डोळे खूप बोलके होते, त्यांची प्रेमळ नजर आम्ही डोळ्यात साठवून घेतली.

नंतर यमुना नदी जी तयार केली होती तिथे आरती बघायला गेलो. देहभान हरपणे म्हणजे काय ते अनुभवले.मंदिराच्या खालच्या भागात दुकानं होते, तिथून श्रीकृष्ण च्या काही वस्तू तसेच भगवदगीता विकत घेतले. प्रसाद म्हणून गरम रुचकर खिचडी होती.ती घेतली.

संध्याकाळी सातला आम्ही परत बसमध्ये बसलो.गाडीत चहा ऐवजी

सुंदर गरम गरम आयुर्वेदिक काढा प्राशन केला. वेफर्स,ढोकळा, गुलाबजाम व चकली ई, पदार्थ दिले, आम्ही त्यांच्या पाहुणचाराने स्तिमीत झालो ,आमची घरच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काळजी घेतली. परत एकदा हजेरी झाली व आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.

,प्रवास जास्त लांबचा होता त्यामुळे काही महिलांना थोडा त्रास

झाला, पण ते आम्हाला मान्य आहे ,

एकंदरीत आमची इस्कॉन ,पालघर ,प्रति वृंदावन ही ट्रिप

समाधानकारक झाली हे माझे मत आहे,. माई, सहल समितीतील सख्या व प्रज्ञा ताई सर्वांनी मोठ्या काळजीने व प्रेमाने नीट आयोजन केले.मी इस्कॉन प्रभुजी ,प्रज्ञा ताई, सहल समिती व माईंचे आभार मानते

 आपल्या,

विंदा पाठक ,अर्चना कुलकर्णी

साई महिला.

Thursday, 3 November 2022

नातं


*"नातं" हे गरजेपुरतं असण्यापेक्षा नसलेलं कधीही चांगलं. कधी कधी आपली वाटणारी माणसं अशी असतात की आपलं आणि त्यांचं काहीही नातं नसतं तरीही ती आपली वाटतात. कामापुरती जवळ आलेले लोक नेहमीच स्वार्थी आणि घातकी असतात तर आपल्या सुखात सुख मानणारी माणसं खूप कमी असतात. एखादंच नातं असावं जिवाभावाने आपल्या सुखदुःखात सोबत असणारं आपल्या मनातील भावना, दुःख न सांगताओळखणारं हक्काचं आणि जिवाभावाचं नातं असावं...**.


आहेत किती अशी नाती?

त्यावरच ठरवी श्रीमंती!

Saturday, 29 October 2022

रक्षाबंधन

 रक्षा बंधन

राखी असो चांदीची वा गोंड्याची 

साक्ष असे बहीण भावाच्या प्रेमाची 

बालपण ते मोठे होणाऱ्या प्रवासाची 

आयुष्यभर असणाऱ्या साथीची!

जबाबदारी जरी रक्षणाची

तरी जरूरी नाही वचनांची!

अतूट अशा प्रेमबंधनाची

नाही वाटत कधी ओझ्याची,

कहाणी असे त्यात विश्वासाची

अडीअडचणीत भक्कम आधाराची,

न मोजता येणाऱ्या किंमतीची

म्हणूनच जागा मनात मानाची!


राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

अर्चना कुलकर्णी...©®

Tuesday, 25 October 2022

दिवाळी.. सामाजिक



 आज मॉर्निंग वॉक फारच वेदना देऊन गेला. एरव्ही आवारात  कागदाचा कपटाही दिसायचा नाही, मात्र आज जाळलेल्या आणि न जाळलेल्याही  फटाक्यांचा खच पडला होता. अनेक कोरे, अनार, बॉम्ब, जमीन चक्रे न वापरता त्या जाळलेल्या, रस्त्यात टाकले होते . आर्थिक स्तर उंचावला पण सामाजिक भान विसरले.... 

Friday, 23 September 2022

स्व त्व जपा


लपते पण जपते

माझ्यातले मी पण,

संसारात गुरफटते 

स्वातंत्र्य घेते तरी पण

नात्यांमध्ये मिसळते,

एकटेपण जपते तरी पण

विचार स्वतः चा करते

मान व मन मोठ्यांचे जपते पण

मोठे निर्णय घेते चटकन

जबाबदारी त्याची घेते पण,

केलेल्या कामात

काढतात कोणी चुका,

जबाबदारी न घेणाऱ्याचे 

होते कधी कौतुक,

तरीही पुनः जबाबदारीस 

होते तयार 


असेच कधी तरी शोधते

माझेच मी *स्व* पण



Thursday, 15 September 2022

स्वप्न अलक

 अलक....#


एअर इंडिया क्रमांक 8922 उडान के लिये तैयार हैं, पॅसेंजर अर्चना कुलकर्णी को विनंती की जाती हैं, वो तुरंत अपने विमान की तरफ प्रस्थान करे |.... अरे, हे काय नेहमी वेळेआधी पोचणारी मी, आज विमानाने जायचे तर उशीर कसा झाला? असा विचार करत विमान द्वारापाशी धावत सुटले....

हवाईसुंदरी चे अभिवादन स्वीकारून मी विमानात प्रवेश केला..... आत सर्व माझे नातेवाईक बसले होते. मामा, मावश्या, आई बाबा, आईचे काही नातेवाईक, समोरच्या सीटवर सासूबाई व दीर.... "तुझ्यामुळे विमान सुटायला उशीर झाला " असे सासूबाईचे बोलणे ऐकुन मी खजिल झाले... प्रत्येकाला भेटून किती वर्षांनी भेटलो असे बोलत मी पुढे जात होते.....

अचानक माझी झोप उडाली, जाग आल्यावर आठवले तर ते सर्व नातेवाईक अगदी लहानपणापासून कधीतरी आयुष्यात आलेले पण आज हयात नाहीत तेंच होते.. पितृपक्षात मला आठवण देण्यास आले होते की दुसरा काही संकेत???


अर्चना कुलकर्णी.©®

Saturday, 3 September 2022

महिला दिनानिमित्त

 महिला दिनी


आज च्या ह्या महिला दिनी -

पहिला  माझा चरणस्पर्श फुलेंना (महात्मा ) करीन गं

स्त्री शिक्षणाची दारे उघडली त्यांनी गं !

दुसरे नमन सावित्रीना करेन गं 

रोष पत्कारुनी समाजाचा शिकुनी शहाणी झाली गं !

तिसरे वंदन महर्षिना (कर्वे) करते गं 

शाळा उघडॉनी  जागोजागी स्त्रीला जागे केले गं !

चौथा प्रणाम कर्मवीरांना करते  गं 

शिक्षणाचा मोठा प्रसार त्यांनी देशी केला गं !

पाचवा नमस्कार बाबांना करते ग

मुलगा -मुलगी भेद कधी नाही केला ग

सहावा नमस्कार आईला मी  करते ग

स्त्री जन्माची महती सांगून मज आत्मविश्वास दिधला ग

सातवे वचन माझे मलाच गं 

काम करता करता माझे अस्तित्व जगवेन  गं !

अर्चना कुलकर्णी .

8.3.2022

लाडू

 लाडू


बेसन लाडू

रव्याचा लाडू

दीपावलीत

मोठाच मान


कडक बुंदी

वा मोतीचूर

लग्नाकार्यात

यांचीच गर्दी


राघवदास,

चुरमा लाडू

शिवशंभूस

सदा आवडी


तिळाचा लाडू 

गोड बोलावे

सांगत असे

खाऊन भाव 


डिंकाचे लाडू

अळीव लाडू

बाळंतीणीला

करावे खास


बाळाकरिता

आईचा असे

पोळीचा लाडू

खासमखास!


अर्चना कुलकर्णी...

मुक्त मी

 मुक्त मी...


(दोन छोट्या पिल्लांसाठी, आई सोडते नोकरी, तेव्हाचे तिचे विचार...)


नोकरीतला शेवटचा दिवस

होणार आज मुक्त मी,

नाही आता ऑफिसचे कष्ट 

उद्यापासून माझी राणी फक्त मी!

भेटणार नाहीत छोट्या मोठ्या सख्या

म्हणून दुःखात आहे मी

पिल्लांसोबत लाभेल जास्त सहवास

म्हणून आनंदात आहे मी...!

नाही कामावर जायची घाई

म्हणून आळसात मी!

वेगवेगळे पदार्थ बनवण्याची नवलाई

म्हणून उत्साहात मी! 

ऑफिसमधील चकाचक टेबलं नाही

म्हणून खेदात मी!

खेळण्याच्या पसाऱ्याने भरलेली खोली

हसून निहारते मी ! 

महिनाअखेरीस बँकेत जमा नाही

मन व्यथित होई,

पाहून पिल्लांचे हसरे चेहरे

मन माझे हर्षित होई,


अशीच मी

मुलांच्या मायेच्या बंधनात,

सुखात मुक्त मी!


अर्चना कुलकर्णी....

2.9.2022

Saturday, 16 July 2022

नायगारा

 नायगारा सफर..


निसर्गी अनेकविध चमत्कार

त्यातील एक नायगारा प्रपात,

आठवे तो जरी वर्षे झाली चार

पुलावरुनी दृश्य दिसें मनोहर,

असे अर्धश्चन्द्रकृती आकार

पाहण्या लोटली गर्दी असे तुफान

वेगवेगळे वेष अन वेगवेगळे देश

असले जरी सारे सान थोर 

साऱ्यांची झाली तरुण मन

प्रपात बघण्या करावी बोटीची सफर

घेऊनी तिकीट उभे एका रांगेत

चढवला रंगीत रेनकोट अंगात

आली आली ती mist बोट

पकडला खालचा डेक कोपरा

आवडे मज तो थंड वारा बोचरा

उंच उंच उडती रंगीत जलधारा

दिसें प्रपात प्रचंड कोसळणारा 

जाता प्रपाताजवळी आले थंड तुषार

 विविध आवाजाचा होई चित्कार

सप्तरंगी दिसें सुरेख कमान

कुठे भिडे पाण्यास आसमान

वाटे की स्वर्गात च आले

हरवून बसले माझे भान 

हळूच बोट वळली,जरा कलांडली

लाट उसळून आत आली

पुनः सारी हास्याने खळखळली 

सभोंवार कॅमेऱ्यांचा लखलखाट

कुठून सुरु झाला दिव्यांचा झगमगाट

अवर्णनीय, चित्त थरारक,रम्य प्रहर 

संपली अविस्मरणीय आनंदात सफर!


अर्चना कुलकर्णी...

Friday, 10 June 2022

चित्रकाव्य

 चित्र  काव्य

आयुष्याच्या संध्याकाळी

बसले मी उंबऱ्याशी 

वाट पाहते  माउली

कसे समजावू मनाशी?


पंखात येता बळ

पिल्लं गेली उडूनी

सरत राही काळ

कोणी ना येई परतोनी


आशा तरीही मनात

येईल कोणा याद

ओढ अजुनी नजरेत

होईल स्वप्न साकार


येतील काही काळासाठी

गोड शब्द येतील कानी 

घरास करतील रंगरंगोटी

होईन मी त्यात समाधानी!


अर्चना कुलकर्णी....

7/6/2022

Friday, 27 May 2022

प्रसंगकाव्य

 प्रसंगकाव्य


खारुताईने

 पिल्ले ठेवली ढोलीत

निघाली अन्न शोधीत,

दोन झाडें वाढलेली

एकमेकांत गुंतलेली,

सरसर चढली झाडावर

झरझर गेली दुसऱ्या झाडावर,

पिल्लांसाठी घेतला खाऊ

मनात म्हणे घरी जावून खावू,

आली महावितरणची गाडी

फटाफट फांदया तोडी,

झाडें दोन्ही झाली मोकळी

एकमेकांपासून ती वेगळी,

परतीचा मार्ग हरवला

अश्रू की हों आले डोळा,

पिल्ले लागली ओरडायला

कोणी नव्हते बघायला,

कसा सापडेल मला पैलतीर?

खारुताईने केला धीर,

हळूच पकडली वीजेची तार

तूच माझी तारणहार,

कसरत करत पोचली

आपल्या झाडावर,

पिल्लांच्या आनंदाला

नाही उरला पारावर!



(सकाळी फिरताना दिसलेल्या दृश्यावर )


अर्चना कुलकर्णी...

27/05/2022

Sunday, 1 May 2022

असेच मनातले

 लग्न झाल्यावर मुलगी नवऱ्याच्या घरी येऊन त्या घराला, माणसांना आपलंसं करायचा प्रयत्न करते. नवऱ्याच्या सर्व नातेवाईकांबरोबर संवाद साधते, नातं रूजवते. इतकंच नाही तर कित्येकदा नवऱ्याची फिरतीची नोकरीव्यवसाय असेल तर त्याच्याकडचे सर्व कार्यक्रम , बारशी बारावी त्याची प्रतिनिधी होऊन अटेंड करते. सासूचे प्रेमाने करते....

            नवरा मात्र काही वेळा याउलट वागताना दिसतो. बायकोनं आपले नातेवाईक आपलेसे करावेत ही अपेक्षा असते, ती जेव्हा असं करते तेव्हा ते त्याला मनापासून आवडतं पण तो मात्र बायकोकडच्या कुठल्याही कार्यक्रमात कधीही जात नाही. तिच्या माहेरचं आहे, बघेल ती असा विचार असतो.अगदी भाऊ, बहिणींच्या लग्नातदेखील...बायकोला प्रत्येक वेळी , काय करणार, काम असतं बरंच अशी रेकॉर्ड कायम लावावी लागते. 

          माझ्या माहितीचे असे अनेक नवरे आहेतही की जे अगदी भक्तिभावाने बायकोबरोबर तिच्या माहेरी प्रत्येक कार्यक्रमाला जातात. 

             पण एकंदरच बायकोचं माहेर आणि तिची माणसं याबद्दल एक तिऱ्हाईत भाव ठेवून वावरणाऱ्यांचीही कमी नसते.

Monday, 4 April 2022

चैत्रगौर

 चैत्र गौर


आली आली ग माहेरवाशिण  

ठेवा स्वागतास गुढी आणुन

अंगण सजवा शिंपून सारवून 

सुबक रांगोळी काढा रेखाटून 


लाडकी माझी ही गौराई 

बसली झुल्यात सोन्याई

कोडकौतुका भारी घाई

स्वागताची लगबग होई 


लिंबलोण तिचे उतरोनी

गौरीला देवू गं गूळपाणी

लावू अत्तर गुलाबपाणी 

ओटी भरा या ग साऱ्याजणी 


चैत्रागौरी पाळणा सजला

सुसंगती अक्षफेर धरला

मोगरा सुवास दरवळला

आंबेडाळ ,पन्हे नैवेद्याला 


आमंत्रण गेले लेकीसुनांना

हळदीकुंकु लेकीस मान

करंजी चकली अनारसे छान

पाळण्याला दोरी रेशीमसान 


पुरणाचा हा नैवेद्य आज

गौरीसवे माझीही हौस 

नेसुन पैठणी, ल्याले साज

हळदीकुंकु सोहळा खास 


पंचोपचारे पुजा अर्पिली

चैत्र गौर मनी भावली

मनोभावे फुले वाहिली

आखिती पर्यत विसावली‌


हरभरे ओले ओटीस आले

अत्तर हळुवार हाती स्पर्शले

वेणी,गुलाब केसात माळले 

पाठवणी वेळी डोळे ओले  


सणवारांची हौस ही मोठी

घरी सख्यांची होई दाटी

हौसेने भरली मोत्यांची ओटी

वरदाने भरो धान्याची कोठी 


गौराईची करता पाठवणी

 डोळे गेले पाणावूनी

येईन लवकर जाते सांगुनी

देशी आशिष मन भरुनी 

Tuesday, 29 March 2022

प्रसंगानुरूप....

 प्रसंगानुरूप

होता कधी चुकून टक्कर

आंधळा आहे का? येते कानी

समोर मला पाहुनी

लगेच क्षमा मागती,

आज घडले विपरीत

समोरचा समजून घेईना

वाद घाले माझ्याशी,

उचलून द्यावे सामान

सांगे तो मजशी

ओरडून खूप बोलें

बाजूने जायी एक सज्जन

कळले त्याला माझे असहायपण

शांत करू पाहे त्यासी

उचलुनी देई त्याचे सामान

विचारे मग सोडू का कुठे?

नकार देऊन निघालो मी पुढे

योगायोग असा की ते दोघेही

आले मुलाखतीस माझ्याच ठिकाणी

आवाजावरून ओळखले दोघांना 

 समजले माझ्या नसलेल्या नजरेला 

योग्य त्याला ठेवले नोकरीला

असाच एक दिवस आनंदात गेला....



अर्चना कुलकर्णी....

Wednesday, 2 March 2022

गृहीत

 जेवणवाली काम सोडून जाईल म्हणून तिला जपलं जातं, तिने न मागता पगार वाढवून दिला जातो. 

पण......

बायको नेहमी गृहीत धरली जाते. ती सोडून जाणार नाही हे माहित असते म्हणून तिला जेवणवली एवढी ही लायकी दिली जात नाही. फार घालून पाडून बोलले जाते तिला......



Wednesday, 19 January 2022

तो.....

 तो....


तो हुशार

तो स्वावलंबी

तो शिकला

डॉक्टर झाला

अधिकच रुबाबदार झाला

पूर्वजांची पुण्याई नसूनदेखील

समाजात मान मिळू लागला,

मुलींच्या पालकांची रिघ लागली

अट त्याने एकच ठेवली

मी घरात लक्ष देणार नाही,

सारे तिने बघावे

आणि असावी दिसायला देखणी,

मिळाली त्याला हवी तशी ती,

नाजूक, सुंदर, हुशार अन गुणी,

झाला संसार सुरू,

तिची नोकरी,त्याचा व्यवसाय

सुरू झाला नवा अध्याय,

वाटू लागले तिला,

हवे नको,

आनंद घ्यावा वाटून

सांगितले तिने हौसेने,

वेळ नाही मला,

दिली गोळी तिला

निघून गेला कामाला,

समजावले तिने स्वतःला,

उठून लागली कामाला,

मुलांचे आजारपण, शिक्षण

सारे तिने सम्भाळले,

त्याचे आई वडील,

तिचे नातेवाईक

सारे तिचेच करणे,

कधीच कोणती नाही अपेक्षा,

कोणाचीच नाही उपेक्षा,

हसून खेळून तिचे जगणे,

ठरविक चाकोरीत त्याचे वागणे

वर्षामागून वर्षे चालली,

आयुष्याच्या उत्तरार्धात

अचानक त्याला जाग आली,

तिच्यासोबत निघाला फिरायला,

सोबत होते अजून काही,

तिच्याशी सारे हसून बोलायला

तो मात्र एकटाच बसलेला,

कोणी मागते नवऱ्याचा हात

कोणी मागते हळू चालीची साथ,

तिने नाही मागितली साथ

त्याच्याकडे फिरवली पाठ,

उगाच तो खट्टू झाला,

आपल्या वागण्याचा

पश्चाताप झाला,

एकटेपणाचा शाप

पुढे आयुष्यभर झेलला!



अर्चना कुलकर्णी ©

अमृतमहोत्सव


 चित्रकाव्य.. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

होतोय साजरा जल्लोषात

पाण्यासाठी होते वणवण 

असे का बरे चित्र खेड्यात?


पावसाची कमी असते का

कीं नियोजनात करतो कसूर?

संसाराचा भार सांभाळत

डोईवर सांभाळते घागर!


जाता आणाया पाणी

घेतले सोबत लेकरू

देई त्याला शिकवणी

नको श्रमाला विसरू!


अर्चना कुलकर्णी.

Sunday, 9 January 2022

चित्र चारोळी

 नेत्रासुखद हि हिरवाई

गर्द धुक्यात हरवून जाई

परि नजरेस खिळवून ठेवी

मनास आनंद देऊन जायी!


अर्चना कुलकर्णी...