Friday, 30 October 2020

फुंकर

 फुंकर 

लेक करता भाकर

मध्येच लागे चटका 

माय प्रेमे घाली फुंकर 

आठवे  आज दाटे  हुंदका 

अर्चना कुलकर्णी

मैत्री

 मैत्री 


चेहरा तुझा उतरलेला 

मनात गाळ साठलेला 

तुझ्या सखीने ओळखला 

घेऊन गेली फिरायला !


सांग आता मनातलं 

मी आहे ऐकायला 

डोळे भरून आले 

भरभरून सांगायला !


कंटाळले घरी बसून, 

कोणी नाही बोलायला 

रोज तेच तेच करून 

स्वतः च जेवायला !


बोलून घे सारे सारे 

सखी हसून बोलें 

सोड मोकळे बंध सारे 

एकटी नाही हे जाणवले !


विश्वासाची फुंकर हळुवार 

झाली उघडी ती भळभळ 

होता प्रेमाचा स्पर्श अलवार 

दिसली त्यातील कळकळ !


नकोस जाऊ तू कोशात 

दे तू कधी ही साद 

घेऊन हात हातात 

देईन मी लगेच प्रतिसाद !


जादू सखीच्या फुंकरीची 

न बोलता जाणवली 

दिशा मिळाली विचाराची 

मैत्रीची महती समजली !



अर्चना कुलकर्णी

Wednesday, 28 October 2020

दिवस करोना चे

 दिवस 

दिवस करोना चे सुरु झाले, 

आयुष्य झाकोळून गेले 

घरात बसून जगावे 

जेवणाची चूल झाली शांत 

काही सुचत नाही 

काय करावे? 

सकाळ च नकोशी झालीय 

दिवस खायला उठतो 

सुरळीत आयुष्य 

कोलमडू लागले, 

दिवसांचे झाले महिने, 

अजून कामाला कोणी बोलवत नाही, 

दोन पोरं शिकायचं म्हणून 

आता शिकता येत नाही, 

नाही आता कसली आशा, 

मनाला भीती, सण आला 

काय करू पोरांना खायला? 

नेहमी मिळे बोनस दिवाळीला 

आज काय सांगू पोरांना, 

दारू पिऊन अर्धा झालाय नवरा 

दवाखान्यात मारतो चकरा !

बोलते मी तुमच्याशी 

मन व्हावे मोकळे 

नको मदत पैशाची 

काढू हे ही दिवस 

फक्त लवकर संपु दे हे सारे 

माझी कामं मला मिळू दे !


(आता च माझे माझ्या ठाण्याच्या  कामवालीशी बोलणे झाले, तेच लिहिले)

अर्चना कुलकर्णी.

कोजागिरी...

 प्रियावीण उदास वाटे रात 


रात आहे कोजागिरीची 

पण आज ती विरहाची 

वाट पाहे मी साजणाची !


सांगायचं आहे खूप काही 

परि आज जवळी तू नाही 

सतत आठव येत  राही !


पिठूर चांदण्यांची असे रात

तुझी कधी  मिळेल साथ? 

प्रियावीण उदास वाटे रात. 




अर्चना कुलकर्णी.

Tuesday, 27 October 2020

कांदा

 कांदा 

कांदा.... 

कांदा रडवतो 

कधी शेतकऱ्याला 

 कधी ग्राहकाला 

कांदा अडवतो 

कधी दलालाला  

कधी राजकारण्याला 

कांदा पाडतो

कधी व्यापाऱ्याला 

कधी सरकारला 

कांदा रडवतो 

घरी दारी चिरताना, 

तरी कांदा 

साऱ्यांना आवडतो, 

त्यावाचून 

आपला घास अडकतो.... 


अर्चना कुलकर्णी 😁

दिवस.

 *दिवस*

मनात साठवून 

दिवसाचा अनुभव

जड मन  होतंय  

कडु अन् गोड चव !


रोज च्या कर्तव्यात 

रोज  दिव्य अनुभव 

कधी भावविवशता  

देती कधी अमृतानुभव  !


ठाम एका निश्चयाने

गड जीवनाचा सर

करू पार ओढीने 

हाती अनुभवाची दोर !


दूर तो आशेचा तीर 

कधी करोना चा  घोर

कधी नाचे मन स्वैर.

वा-यावर होऊन स्वार! 


घोर अंधार सारत 

दिवस पाखरु उडे

नवनवे अनुभव  

नवे नाते मैत्री जोडे !


अर्चना कुलकर्णी.

Friday, 23 October 2020

देवींची प्रार्थना

 देवी, अंत नको पाहू आता 

जीव कासावीस झाला, 

करोना संकट दूर सारोनी 

वाचवि आता मानवजातीला !🙏


रोज रोज जपुनी जीव 

भयभीत की हो जाहला 

देऊळ बंद म्हणोनि 

तव दर्शना जीव व्याकूळला !🙏


अनंत चुका करी मानव 

करी माफ तू आम्हाला 

धडा घेऊन ह्यातून 

पश्चाताप तो जाहला !🙏


सान थोर साऱ्यांचा जीव 

काकुळतीस की  आला 

होवो सारे काही सुरळीत 

हेच मागणे मागते अष्टमीला! 🙏



अर्चना कुलकर्णी 

23/10/2020 

🌹🌹

फेर

 फेर 

फेर धरू या ग सख्यानो 

फेर धरू या !

हत्ती बसला ग 

त्यांची पूजा करू या  

गोल करू या ग सख्यानो 

गोल करू या !

गाणी म्हणू या ग 

सासरची गाऱ्हाणी सांगू या 

भोंडला, भुलाबाई खेळू या ग 

भोंडला खेळू या !

लिंबे झेलू या ग 

बुलबुल मोजू या 

गंम्मत करू या ग सख्यानो 

गंम्मत करू या !

खिरापत ओळखू या ग 

खाऊ खावू या 

सण नवरात्रीचा जागवू या ग 

फेर धरू या !


अर्चना कुलकर्णी.




फेर 

नवरात्री म्हणून 

एक हत्ती मांडला 

मुलींनी फेर धरून 

खेळला भोंडला !


अर्चना कुलकर्णी

Thursday, 22 October 2020

नाही विसरता येत

 नाही विसरता येत..... 


मन किती वेडे असते, 

कोणालाच ते दिसत नसते 

 सारे काही साठवून ठेवते 

रिकामे बसले की आठवत राहते. 


आठवणी पण वेड्याचं असतात 

सुखद आठवणी थोडा वेळच थांबतात 

दुःखद आठवणी मात्र रेंगाळत राहतात

 विसरायला गेले तरी नाही विसरता येत


जराश्या धक्क्याने उसवतात 

डोळ्यावाटे बाहेर पडू पाहतात 

पटते जरी घडून गेले विसरून जावे

परि ते कसे जमवावे? 



अर्चना कुलकर्णी. .

Friday, 16 October 2020

विडंबन.. गाऊ कशी अंगाई

 समोरच्या बिल्डींगमागे, चंद्र झोपला ग बाई 

आज माझ्या राजसाला झोप का ग येत नाही? !!!

लोक झोपले घरात, बाहेर करोना फिरत राही 

दिसभर फेसबुक, नाही कसली घाई, 

लॉक डाउन संपण्यासाठी, गाते तुला अंगाई |


कामवाली बाई नसता, भांडी घासणे कपाळी 

लादी, कपडे धुण्याची करतो रे आळीपाळी 

जगावेगळा हा आजार, जगभर पसरे रोगराई !


जगातल्या कामांची ही, होते आहे राखरांगोळी 

कष्टणारे कामकरी, रिती हो तयांची झोळी 

दुःख दाटता हे मनी, गाऊ कशी मी अंगाई? 



अर्चना 

Tuesday, 13 October 2020

चित्रकाव्य


 द्रोण रचना 

संथपणे निघाली 

सागरी मिलना,  

देती निरोप 

निळे घन 

प्रतिमा 

त्यांची 

हो.... 

---------------------

शांत, स्तब्ध जलाशय 

सभोवती हिरवाई रमणीय 

नितळ जळात प्रतिबिंबित 

पाहुनी मन होय मोहित 

------------------=--------

निसर्गाचा सुख सोहळा 

चित्री प्रतिबिंबित झाला 

हिरवा डोंगर जळात रेखला 

देखोनी आनंद मन्मनाला !


-----------

ओढ सागराची 

वाहे सरिता वेगात 

आठवण मनी माहेरची 

तसेच रंगवले का ह्या चित्रात?  

-------------------

चित्रचारोळी 

झाडाझुडुपातुन वाट काढत

 वाहे संथपणे नदी 

की नदीकाठी वाढे  झाडी? 

संभ्रम पडतसे  मनात !



अर्चना कुलकर्णी. 

13/10/20



Thursday, 1 October 2020

वृद्धाश्रम

 वृद्धाश्रम

खूप केली मेहनत व फळेही मिळाली गोमटी

वयाने जाणवून दिले आली आता साठी

शाल, श्रीफळ, गीता न घ्या हातात काठी


आरामखुर्चीवर डोळे मिटून ऐकतोय गोष्टी

जडच झालोय आम्ही ही भावना दुःखी कष्टी

याहो सोडून गाफील ठेवून, भेटू वर्षाकाठी


आपला संसार आपली मुले आपल्या गाठीभेटी

कुठे वेळ आहे औषध गोळ्या पथ्यपाण्यासाठी

ऐका माझे, करा विचार अन निर्णय घ्या ओठी


ब्रह्मचर्य, गृहस्था, वानप्रस्था न सन्यासाश्रम

चार आश्रम माहितीच होते हाच जीवनक्रम

रोज ज्ञानात नवी भर पाचवा आहे वृद्धाश्रम