Wednesday, 26 July 2023

थंडर... माझे पिल्लू




थंडर माझे पिल्लू असे मी आता म्हणते पण तो घरात आणला माझ्या धाकट्या मुलाच्या आग्रहाखातर.. अगदी छोटू दोन महिन्याचे पिल्लू. मी तर घाबरत होते, आणि सांगितलं होते तेंव्हा की मी फक्त त्याचे जेवण बनवून देईन. बाकी सर्व तुम्ही करायचे. धाकटा नितीश बाळाचे करावे त्या प्रेमाने त्याचे शू शी पुसणे, त्याला योग्य वेळेस बाथरूम मध्ये नेणे, फिरायला घेऊन जाणे सर्व करत होता. अतिशय खेळकर...

गोंडस मुलं सगळ्यांनाच आवडतात.तसेच त्याचे झाले,त्यांचं रुसणं, घरभर धावणं, आपल्या जवळ लाड करून घ्यायला येणे हे सगळं मला आनंददायी वाटू लागले.मी बाहेर गेले की लगेचच त्याचे वाट बघणे सुरू, गच्चीवर येऊन बसायचा.

माझ्या स्कूटरचा आवाज ऐकला की धावत कौलवर येई. पडेल की काय असे वाटे. फार वेळ सगळे घराबाहेर असले की चिडायचा आणि मग चादरी ओढून काढ, सोफ्यावर उड्या, कुठे कागद फाड, अशा खोड्या सुरू...लहानाचा मोठा होत होता, आता आम्हाला उशीर झाला की एका कोपऱ्यात जावून बसे, हाक मारली तरी बघणार नाही. मग जवळ जावून लाड करावे, सॉरी म्हणावे, तेंव्हा भुंकून जणू विचारी का उशीर केलात, मी कंटाळलो ना!

 अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. कधी कोणावर ओरडत नसे. परंतु कोणी अनोळखी आले की वास घेऊन बघेल, त्या व्यक्तीला गोल फेरी मारून त्यांच्या तोंडाकडे बघेल.. ती व्यक्ति हसली की त्याचे लाड करावे असे वाटे.जर शांत उभी असेल तर थंडर देखील जागेवर शांत जावून बसायचा.

24 जून त्याचा वाढदिवस आम्ही अगदी केक कापून साजरा करत असू... 

लहान मुलांना थंडरशी खेळायला खूप आवडे, घरी येऊन खेळत त्याला ही मजा येई. एकदा एक दोन अडीच वर्षाचा मुलगा त्याच्या पाठीवर बसला व कान ओढले. तरी तो ओरडला नाही. मुलाला बाजूला केल्यावर हा त्याच्याजवळ जावून उभा राहीला.

गाडीतून फिरायला आवडे. आमची तयारी सुरू झाली की ह्याची दाराजवळ जावून बसे.  खिडकीतून थोडा वेळ बाहेर बघ मग शांत झोप... गाडी थांबली की टूणकण बाहेर उडी कधी मारतो असे व्हायचे त्याला.. प्रवासात कधीच इडली व icecream त्याचे प्रचंड आवडते पदार्थ... Weak point च म्हणा न.. आम्ही खाताना तो अगदी बघत राही, आमचे झाले की लगेच भुंकून त्याची मागणी.. Icecream तर चाटूनपुसून.

करोनाकाळात शेजारी म्हणत प्राण्यांमुळे कोरोना होतो, तुम्ही सांभाळा. नाहीतर सरळ सोडून द्या, आपले मूल म्हणून सांभाळलं त्याला असे सोडून द्यायचे? सरळ सांगायची अशा अफवा पसरवू नका आणि आमच्या घरी तुम्ही येतं नाहीत, तुम्हाला तर काळजी नाही. Touch wood दोन्ही करोना लाटेत आम्हाला दोघांनाही करोना झाला नाही, त्याला जवळपास च फिरवून आणत असू. दोन्ही मुले परदेशीं गेल्यावर तो कायम माझ्या मागे मागे, मी जिथे, तिथे तो...

एकदा त्याला कानाने कमी ऐकु लागले, दोन तीन दिवसात माझ्या लक्षात आले. Dr कडे घेऊन गेलो, तो शांतच होता ना कसली चिडचिड ना वेदनेने ओरडणे... Dr नी तपासून म्हटले थोडे इन्फेकशन आहे, दुखत तर असणार.पण तो तर शांत आहे

तुम्हाला कसे कळले की कानाचा त्रास आहे?

मी म्हटले अहो dr ते माझे पिल्लू आहे, त्याने न सांगताच मला कळले पाहिजे...5 इंजेकशन चा कोर्स केला आणि त्याला बरे वाटले.

असा माझा थंडर चौदा वर्षे आमच्याकडे होता. दोन्ही मुलांइतके त्याच्यावर प्रेम केले.

शेवटचे आठ दिवस मात्र त्याला खूप त्रास झाला. डॉक्टर उपचार करत होते पण उपयोग झाला नाही.दुर्दैवाने माझ्या थंडूचे 15/12/2021 रोजी दुःखद निधन झाले.

आज ही कोणी कुत्रा दिसला की त्याचेच नावं ओठावर येते.


अर्चना कुलकर्णी.

 

Sunday, 2 July 2023

येऊ कशी मी वारीला

 येऊ कशी तशी मी वारीला...


अवंदाच झालं लगीन माझं,

सासू म्हणेल कुठं चालली फिरायला,

अन धन्याचा जीव नाही लागायला 

येऊ कशी तशी मी वारीला... हो...

मी आता तरी कशी येऊ वारीला,

पोरगं हाय माझं दहावीला 

चांगलचून्गल द्यावं त्याला खायाला 

तवाच चांगलं मार्क पडतील त्याला 

येऊ कशी तशी मी वारीला...हो...

 लेक माझी येणार आहे माहेरपणाला. 

चोळी बांगडी कापड, शिदोरी लागते द्यायाला ..

माझ्या बिगर आहे का कुणी घरात करायला.? 

येऊ कशी तशी मी वारीला.... 

सून आहे पोटूशी तिला काय पाहिजे नको का बघायला. 

चार बाया बोलावायच्या डोहाळजेवणाला. 

समंदं करायचं म्हंजी सुरू केली आहे मी कामाला... 

येऊ कशी तशी मी वारीला..... 


आजच आलाय भाच्चा गावी भेटायला मामाला. 

मसालेदार रांधून घालावं  त्यास्नी खायाला. 

नाही तर ननंदबाई लागतील  कावायला. 

येऊ कशी तशी मी वारीला.. 


घरधन्यास्नी बर वाटत नाही 

लयी तरास त्यांच्या जीवाला. 

दवा पाणी द्यायला लागे वेळच्या वेळेला. 

म्याच हाय त्यांची सोबत संगतीला सेवा करायला.. 

येऊ कशी तशी मी वारीला हो....

पोरांनी काढलयं आमच घरच समदच रंगकामाला . 

गडी माणसं येतील कामाला,

मी हवी इथं चहापाणी द्यायला. 

वारीला जाऊ का मी अस कस विचारु पोराला?

येऊ कशी तशी मी वारीला.. हो...


 विठूराया धाडे सांगावा जनाबाईला 

येऊ नका तुम्ही वारीला,

तरी मीच येईन तुमच्या संगतीला. 

 मी जाणतो जनाबाई तुमच्या साऱ्या अडचणीला!


 

          सौ.अर्चना कुलकर्णी