Sunday, 14 January 2018

तिळगूळ

तिळगुळ
आज सहज च आठवले,
मोबाईल तर अस्तित्वात नव्हतेच पण साधे फोनही सर्वांकडे नव्हते.
जानेवारी सुरु झाला की रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकान दिसायची व  स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची.
मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून आप्पा सर्व नातेवाईकांना  पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायचे.
काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.अप्पांची ही सवय आणि त्याची आठवण ,ते गेल्यावर अनेकांनी काढली.
कारण ही तसे च होते, अप्पा 16 जानेवारी ला कोमात गेले आणि त्याच वर्षी फक्त कोणाला ग्रीटिंग पाठवले नव्हते.
हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असायचा आणि सुगंध असतो, नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावना, सदिच्छा यांचा !


पाकिटातून आलेले दोन चार दाणे जेव्हा माझ्या हातावर पडले तेव्हा  लग्नानंतर ची पहिली संक्रांत असल्याने ,अप्पांच्या दोन च ओळींनी डोळ्यात टचकन पाणी आले.एका च शहरात होतो, संक्रांत सण म्हणून सारे येणार देखील होते , तरी अप्पानी आठवणीने मला देखील तिळगुळ पाठवला होता पत्राने.त्या पत्रातल्या अक्षरावरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवला.

कितीही चांगले टाईप वापरून , रंग ,फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगानं येताहेत सोशल मिडीयावर पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या " काळजी घे " ची सर कशाला नाही.

आता अस पत्र हाताने कधी कुणाला लिहून पाठवल होत शेवटी हेही आठवत नाही. हाताने लिहिणं थांबलंय तर पत्र लांबची गोष्ट.

हा फोटो न शुभेच्छा मेसेजचा पूर कितीही आला तरी काहीसा कोरडा वाटतोय.
बदल होत राहतात , बदल होण एवढच फक्त चिरंतन आहे हेही कबूल पण असे दिवस काहीतरी जुन्या आठवणी चाळवून जातात न आतून सगळ ढवळून जातात.

तिळगुळ घ्या गोड बोला , बोलण्यासाठी वेळ काढा !
संवाद असू द्या स्नेह असू द्या !!
अर्चना
14/1/2018