Friday, 16 June 2023

मिशन क्रिक फार्मर्स मार्केट

 नेहमी मुलांकडून फार्मर्स मार्केट चे कौतुक ऐकून होते. Kelowna (BC, कॅनडा ) इथे नितीश (धाकटा ) म्हणाला आपण आज फार्मर्स मार्केट ला जाऊ या.. डोळ्यासमोर दादर भाजी मार्केट न येता नाशिक चे मार्केट यार्ड आले... शेतकरी भाज्या घेऊन येतात, त्याचा लिलाव होऊन मोठे व्यापारी मध्यम व्यापाऱ्यांना विकतात... हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीरीचे गड्डे डोळ्यासमोर नाचले....

इथे तसें काहीच नाही... मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता ह्याचा झणझणीत वास... अहं हं तसा अनुभव  इथल्या farmers market शेतकऱ्यांचा ताज्या भाजी मार्केटमध्ये मिळाला नाही .सगळ्या भाज्या शिस्तीत छोट्या खोक्यात, मध्यम टोपलीत किंवा बेतशीर लांकडी पट्टयांच्या बादलीत भरून ठेवलेल्या त्यांला किंमतीचे लेबल लावलेले. अख्खे खोके /टोपली / बादली खरेदी करायची . इथे ना भाजी कमीजास्त घेणे , ना भावात घासाघीस.सगळा हिशोब म्हणजे वजन पाऊंड मध्ये... त्याचे रुपयात मूल्य करायचे ठरवले तर काहीच खरेदी करता येणार नाही...भेडीचे नाक मोडा, दुध्यांत नख टोचून बघा,गरगरीत वांगी मऊघट्ट परत चांचपून बघा याचा आनंद न घेताच गुपचुप भाज्या खरेदी केल्या. काय वेगळे तर झुकीनी खरेदी केली, बॉक्सभर...

        इथल्या भाजी मंडईत कमालीची स्वच्छता,शांत वातावरण ,कांही राखीव जागेत खरेदीदारांचे क्षुधाशांतीसाठी ताज्या खाद्य पदार्थांचे व चहाकॉफीचे स्टॉल, बसायला छान टेबलखुर्च्या मांडलेल्या.लहान लहान स्टॉल्स् ,छोटे मोठे कपडे, दागिने, सुगंधी मेणबत्त्या,क्रोकरी, फुलझाडे, बगिचा सजावटीसाठी रंगवलेले दगड,धातुच्या कलाकृती ठेवलेल्या .

ह्या सोबत एक माणूस  गाऊन मनोरंजन करत होता, समोर खुर्च्यावर प्रेक्षक माना डोलवत तर कांही नाचून साथही देत होते असे आजवर न बघितलेले दृश्य या भाजी मंडईत अनुभवायला मिळाले.

   


*झुकीनी राईस

 यासाठी मोकळा भात हवा किंवा शिळा मोकळा भातपण चालेल.तेल / तुपावर मोहरी,कढिपत्ता, सुकी लाल मिरची,उडीद डाळ परतवून घ्या मग झुकीनी किस व आले किस टाकून मीठ टाकून ढवळून झांकून किसाला वाफ आणून मऊ करायचे मग त्यांत मोकळा भात ,ताजा नारळ चव,कोथिंबीर टाकून कांट्याने अलगद सर्व एकत्र करा थोडावेळ परत वाफ आणून आस्वाद घेतला....