Friday, 23 September 2022

स्व त्व जपा


लपते पण जपते

माझ्यातले मी पण,

संसारात गुरफटते 

स्वातंत्र्य घेते तरी पण

नात्यांमध्ये मिसळते,

एकटेपण जपते तरी पण

विचार स्वतः चा करते

मान व मन मोठ्यांचे जपते पण

मोठे निर्णय घेते चटकन

जबाबदारी त्याची घेते पण,

केलेल्या कामात

काढतात कोणी चुका,

जबाबदारी न घेणाऱ्याचे 

होते कधी कौतुक,

तरीही पुनः जबाबदारीस 

होते तयार 


असेच कधी तरी शोधते

माझेच मी *स्व* पण



Thursday, 15 September 2022

स्वप्न अलक

 अलक....#


एअर इंडिया क्रमांक 8922 उडान के लिये तैयार हैं, पॅसेंजर अर्चना कुलकर्णी को विनंती की जाती हैं, वो तुरंत अपने विमान की तरफ प्रस्थान करे |.... अरे, हे काय नेहमी वेळेआधी पोचणारी मी, आज विमानाने जायचे तर उशीर कसा झाला? असा विचार करत विमान द्वारापाशी धावत सुटले....

हवाईसुंदरी चे अभिवादन स्वीकारून मी विमानात प्रवेश केला..... आत सर्व माझे नातेवाईक बसले होते. मामा, मावश्या, आई बाबा, आईचे काही नातेवाईक, समोरच्या सीटवर सासूबाई व दीर.... "तुझ्यामुळे विमान सुटायला उशीर झाला " असे सासूबाईचे बोलणे ऐकुन मी खजिल झाले... प्रत्येकाला भेटून किती वर्षांनी भेटलो असे बोलत मी पुढे जात होते.....

अचानक माझी झोप उडाली, जाग आल्यावर आठवले तर ते सर्व नातेवाईक अगदी लहानपणापासून कधीतरी आयुष्यात आलेले पण आज हयात नाहीत तेंच होते.. पितृपक्षात मला आठवण देण्यास आले होते की दुसरा काही संकेत???


अर्चना कुलकर्णी.©®

Saturday, 3 September 2022

महिला दिनानिमित्त

 महिला दिनी


आज च्या ह्या महिला दिनी -

पहिला  माझा चरणस्पर्श फुलेंना (महात्मा ) करीन गं

स्त्री शिक्षणाची दारे उघडली त्यांनी गं !

दुसरे नमन सावित्रीना करेन गं 

रोष पत्कारुनी समाजाचा शिकुनी शहाणी झाली गं !

तिसरे वंदन महर्षिना (कर्वे) करते गं 

शाळा उघडॉनी  जागोजागी स्त्रीला जागे केले गं !

चौथा प्रणाम कर्मवीरांना करते  गं 

शिक्षणाचा मोठा प्रसार त्यांनी देशी केला गं !

पाचवा नमस्कार बाबांना करते ग

मुलगा -मुलगी भेद कधी नाही केला ग

सहावा नमस्कार आईला मी  करते ग

स्त्री जन्माची महती सांगून मज आत्मविश्वास दिधला ग

सातवे वचन माझे मलाच गं 

काम करता करता माझे अस्तित्व जगवेन  गं !

अर्चना कुलकर्णी .

8.3.2022

लाडू

 लाडू


बेसन लाडू

रव्याचा लाडू

दीपावलीत

मोठाच मान


कडक बुंदी

वा मोतीचूर

लग्नाकार्यात

यांचीच गर्दी


राघवदास,

चुरमा लाडू

शिवशंभूस

सदा आवडी


तिळाचा लाडू 

गोड बोलावे

सांगत असे

खाऊन भाव 


डिंकाचे लाडू

अळीव लाडू

बाळंतीणीला

करावे खास


बाळाकरिता

आईचा असे

पोळीचा लाडू

खासमखास!


अर्चना कुलकर्णी...

मुक्त मी

 मुक्त मी...


(दोन छोट्या पिल्लांसाठी, आई सोडते नोकरी, तेव्हाचे तिचे विचार...)


नोकरीतला शेवटचा दिवस

होणार आज मुक्त मी,

नाही आता ऑफिसचे कष्ट 

उद्यापासून माझी राणी फक्त मी!

भेटणार नाहीत छोट्या मोठ्या सख्या

म्हणून दुःखात आहे मी

पिल्लांसोबत लाभेल जास्त सहवास

म्हणून आनंदात आहे मी...!

नाही कामावर जायची घाई

म्हणून आळसात मी!

वेगवेगळे पदार्थ बनवण्याची नवलाई

म्हणून उत्साहात मी! 

ऑफिसमधील चकाचक टेबलं नाही

म्हणून खेदात मी!

खेळण्याच्या पसाऱ्याने भरलेली खोली

हसून निहारते मी ! 

महिनाअखेरीस बँकेत जमा नाही

मन व्यथित होई,

पाहून पिल्लांचे हसरे चेहरे

मन माझे हर्षित होई,


अशीच मी

मुलांच्या मायेच्या बंधनात,

सुखात मुक्त मी!


अर्चना कुलकर्णी....

2.9.2022