*कल्पतरू जागतिक साहित्य मंच*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम काव्य लेखन*
*लग्न सोहळा विशेष उपक्रम*
*विषय:- केळवण*
*उपक्रमासाठी रचना*
उत्साह मावशीचा
भाचीचे लग्न ठरले
मावशी फार आनंदली
केळवण तिने ठरवले,
मावशी आठवू लागली
काय आवडते राणीला?
करू तोच बेत पंगतीला,
भेळ पुरी, पाणी पुरी
की करावे रगडा पॅटिस?
नको बाई असले काही
सारे बोलतील काहिबाही,
पिझ्झा, बर्गर जरी आवडे तिला
त्यात केळवणाचा थाट कुठला?
पंजाबी जेवण होईल जहाल
चायनीजचा तर नको विचार
करू या जेवण मराठमोळ
वरण, भात, लोणकढी तूप
पुरी अन बटाट्याची भाजी
तळू या थोडी कांदा भजी
आणि करू या मटार करंजी,
बिरड्याची उसळ अन
मसालेभात होईल मेनू खास
गोडमध्ये गाजरहलवा
खुलून दिसेल छान
पुरणपोळीला ही देवू
ताटामध्ये पहिला मान
चटणी, कोशिंबीर, मेतकूट
सांभाळतील डावी बाजू
विविध रंगानी,पदार्थांनी
केळवणाचे ताट लागले सजू,
सभोवती फुलांपानांची रांगोळी
मण्यांची महिरप ती ही मांडली,
उदबत्तीचा पसरे सुवास
प्रसन्न हसून राणी घेई घास!
मावशीने केले भाचीचे औक्षण
मनासारखे झाले केळवण!
अर्चना कुलकर्णी, नाशिक.