Thursday, 2 August 2018

माझा पहिला विमान प्रवास

 कधीचं ठरवलं होतं मी की माझ्या पहिल्या विमान प्रवासाबद्दल लिहीन म्हणुन आज मुहुर्त उगवला 

 29 वर्षापूर्वी परदेशी प्रवास सगळ्यांनाच एक अप्रुप असायचं तेव्हा आजच्यासारखे tour ला जात नसत परदेशात . त्यातुन मी एकटी जाणार ते पण पावणे दोन वर्षाच्या मुलाला घेऊन म्हंटल्यावर आईबाबांच्या पोटात गोळाच आला होता कारण परदेशीं आमच्या घरातून जाणारी मी पहिलीच . मस्कत ला महेश आधी गेले होते . मग आम्हाला दोघांना visa पाठवून,कसे यायचे सगळं समजावुन सांगितलं होतं एअर पोर्टवर गेल्यापासुन विमानात बसेपर्यंत काय काय असतं ते . आणि तिथे उतरल्यावरपण काय असेल ते . मी जमेल तेवढं सगळं लक्षात ठेवलं होतं . आणि पॅकींग करत होते.फोन देखील नव्हता घरी, शेजारी काकूंकडे फोन यायचा महेशचा. मग त्या बोलण्यातून काय मिळते काय नाही हे लक्षात ठेवत खरेदी करत होते...

किती करावे शॉपिंग? बॅग भरली ती 30kg झाली, जणू काही तिथे मिळतच नाही अशा तर्हेने.  साबुदाणा खिचडी हा weak पॉईंट तिथे साबुदाणा मोठा मिळत नाही म्हणून 2किलो साबुदाणे च होते 😄

दाण्याचे कूट, अनारसे पीठ, चकली चिवडा, लोणची, कुरडया असे असंख्य पदार्थ, तिघांचे कपडे आम्ही घेतलेले, नातेवाईकांनी प्रेमाने दिलेले असे भरपूर 😄

एक केबिन बॅग ज्यात जास्तीचे कपडे का तर कधी हि बॅग हरवते, यायला उशीर होतो म्हणून त्यात दोघांचे चार दिवसाचे कपडे, अळूवडी, खरवस, पुरणपोळी खास आपले तयार पदार्थ त्याचे वजन 12 किलो.  पर्स मध्ये पासपोर्ट ठेव व पैसे, डॉलर ठेव इतर काही नको तरी त्यात अतिश,मुलाकरीता खीर, शिरा, तूप साखर पोळी, पाणी , दूध असे पदार्थ आणि प्रवास किती तासाचा तर 2तासाचा, तो हि पहाटेच पण सारे खाणे सोबत .. 

जसे जसे जाण्याचे दिवस जवळ येत होते तशी एक अनामिक भीती वाटत होती . 1वर्षानंतर भेटणार हा आनंद, कसं असेल मस्कत? ही उत्सुकता , आईबाबा सगळेच काही महीने तरी भेटणार नाही याचे दु:ख सगळंच एकत्र झालं होतं........


               2ऑगस्ट 1992 पहाटे 3चे माझे फ्लाईट होते तीन तास आधी एअर पोर्टला पोहोचायला हवे असा नियम होता,

पावसाळा उशीर नको व्हायला म्हणत आम्ही रात्री 10.30,10.45ला च पोहोचलो. एक तासभर सर्वांशी गप्पा मारून सगळ्यांचा निरोप घेउन मी चेकइन काउंटरकडे गेले, front सिटसाठी त्यांना विनंती केली मुलगा लहान पाहून ती त्यांनी लगेच मान्य केली . आता बॅग चे वजन.. 20 किलो दोन चालत होत्या,दोन तिकिटे होती, परत सगळे समजावून सांगितले की तो कशी बॅग उचलणार म्हणून एकच बॅग केलीय नशिबाने जास्त कटकट झाली नाही.  इतर formalities पार पडल्या बोर्डींग पास हातात आला तो नीट ठेवून सिक्युरिटी चेकइन करुन कडेवर पेंगुळलेला अतिश,12 किलोची hand बॅग, पर्स, पावसाळ्यामुळे छत्री हे सगळे सांभाळत मी गेट शोधायला निघाले सगळ्या पाट्या बघत बघत गेटजवळ येउन पोहोचले . जरा बसावे तर आजूबाजूला केरळी लोक किंवा मुस्लिम लोक च दिसत होते पण खरंच ते चांगले होते, दीदी म्हणत माझ्या व mulakarita म्हणून दोन खुर्च्या रिकाम्या करून दिल्या.आता तर अतिश झोपलाच पूर्ण आणि अशातच बोर्डींग सुरु झाल्याची announcement झाली मी त्याला व पर्स सावरत उठले आणि बाजूच्या माणसाने माझी बॅग उचलून घेतली. आपली बॅग कोणाला देऊ नकोस कोणाची बॅग तू घेऊ नकोस, डोक्यात आदळत होते पण नाईलाज होता, त्या माणसापाठोपाठ गेटमधुन आत गेले माझ्या पहील्या  विमान प्रवासासाठी.


          Front seat म्हणजे पहिलीच सीट असेल असा भ्रम दूर झाला .आधी first क्लास business क्लास मग इकॉनॉमी त्या छोट्या मार्गीकेतून मुलाला कडेवर घेऊन चालणे एक कसरत करत सीट पाशी पोचले.स्वत:भोवती बेल्ट बांधणे आणि सुरक्षतिततेच्या सगळ्या सुचना लक्षपूर्वक ऐकत होते . विमान झेपावण्यासाठी हळुहळु पुढे सरकत होतं मग थांबुन एकदम वेगात ते आकाशात झेपावण्यासाठी जसे निघाले तशी छातीतली धडधडपण तितक्याच वेगाने वाढली कानाला दडे बसले . थोड्यावेळाने विमानाबरोबरच मी पण शांत झाले. आता माझं बाहेर लक्ष गेलं चांदणं इतकं जवळुन कधीच पाहीलं नसल्याने त्यात मी हरवुन गेले त्यावेळी मी एक लहान मुलं झाले होते कित्ती नवल वाटत होतं सगळ्याचं . ते ढगांचे पुंजके अगदी कापुस पिंजुन ठेवल्यासारखेच भासत होते. मग मात्र नंतर हे सगळं दिसेनासे झाले . भुकेची जाणीव होतच होती की हवाई सुंदरीने जेवण पुढे आणुन ठेवलं . जेवण झालं . दिवसभराच्या धावपळीने खरेतर खुप थकले होते पण झोप काही येईना . शेवटी तशीच डोळे मिटुन बसले . तेवढ्यात Announcement झाली थोड्याच वेळात मस्कत एअरपोर्टवर लॅंड होणार असल्याची आणि मी शटर उघडून पाहिले तर बाहेर उजाडत होते . हळूहळू jerk देऊन विमान थांबले,विमानातुन समानासहित बाहेर आले. एअर पोर्ट फार सुंदर होतं. आता कोणत्या बेल्ट वर ते पाहून मी त्या बेल्टजवळ पोचले, कडेवर मुलाला घेऊन त्या बेल्टवरची बॅग मी कशी उचलणार असा विचार येतोय तोवर माझी बॅग बेल्टवरून पुढे जाऊ लागली, ती परत येईल वगैरे काही माहीत नव्हतेच भीतीनेच ओरडले my bag, my bag.. एक arabic माणूस आला, खुणेनेच विचारले कोणती? Large असे म्हणतं हाताने त्याला bag दाखवली.  त्याने एका झटक्यात ती bag खाली घेतली, मला तिथे च उभे राहायला सांगून trolley घेऊन आला, trolley वर मोठी bag ठेवून बाजूला hand bag ठेवायला सांगितले, सारे खुणेच्या भाषेत त्याला इंग्लिश येत नव्हते. त्याच्या मागोमाग चालत इंमिगरेशन काउंटर ला पोचले, भली मोठी रांग होती. कसे माहित नाही पण तिथल्या ऑफिसर ने मला पुढे बोलावले, ममा first असे म्हणत माझा passport घेऊन योग्य ते शिक्के मारून दोन्ही पासपोर्ट परत दिले, you go.   झाले काम मनात म्हणून सुस्कारा सोडला. माझी bag ट्रॉली घेऊन तो माणूस देखील बाहेर आला. समोरून महेश चा हात हलवताना दिसला आणि माझा जीव भांड्यात पडून आनंद गगनात पोचला...

सामान ढकलत आणनाऱ्या माणसाला मी thankyou म्हणतेय तर तो शुक्रन.. Money money म्हणू लागला.   आनंदाने मी त्याला 50$ दिले... नंतर कित्येक महिने 1000च्या वर रुपये आपण टिप दिली, जेंव्हा माझा पगार 3000रुपये होता. हे आठवून हसत होते.  असा माझा पहिलावाहिला विमान प्रवास. 😄

अर्चना कुलकर्णी...