Friday, 2 December 2016

हास्य

हास्य 
हास्य म्हणजे काय हे वेगळे सांगायला नको ,बालपणी चे हास्य ते खरे हास्य का ?

खावून पिउन सुखी असलेल्या आणि भाऊ बहिणींची प्रेमळ माया असलेल्या मध्यम वर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला हे माझे मोठेच भाग्य..!त्या काळच्या अश्या कुटुंबाचे आईवडील विद्या आणि कला ह्यांचा आदर करणारेच असत.
सिनेमाच्या 2 रुपयाच्या  तिकिटाला हात आखडता घेणारे वडील,शाळा कॉलेजच्या कोणत्याही खर्चासाठी कधीच नाही म्हणत नसत लहान मुलांच्या नाटकाला मुद्दाम हून घेऊन जात असत , बस ने दादर ला शिवाजीमंदीर इथे किती बालनाट्ये पाहिली त्याची गणती नाही ,ती नाटके बघताना येणार हसू , त्याच बरोबर येणारे विचार हे हे वेगळे च होते . 

बाहेरचे खाणे ही चैन समजणारी,आणि त्यासाठी एकही पैसा खर्च न करता ते सर्व खाद्यपदार्थ स्वतःच्या हाताने बनवून आम्हाला खाऊ घालणारी आई,आम्ही कोणत्याही क्लासला जायचे म्हटले कि लगेच फीचे पैसे हातावर ठेवायची.मग तो भावाचा सुतारकीचा  क्लास असो,बहिणीचा शिवणकामाचा क्लास असो कि ,एखाद्याचा चित्रकलेचा असो...वडील दादर सार्वजनिक वाचनालयाचे सभासद, नेहमी वेगवेगळी पुस्तके आणत ती वाचण्याचा एक वेडा मला   छंद लागला .शिवणकाम विणकाम ह्यात कधी फारसे मन गुंतले नाही , अडून नको राहायला इतपत शिवण शिकले , लोकरीचे स्वेटर मोजे ,स्पंजच्या बाहुल्या , शिंपल्यांची तोरणे , मोत्याच्या बांगड्या   त्या वेळेस ज्या काही नवीन  शिकण्यासारख्या होत्या त्या सर्वाकरिता वेळ व पैसे दिले जात . फार सुंदर होते ते दिवस.उत्साह आनंद ह्यांनी रसरसलेले....!

खेळ,स्पर्धा,बक्षिसे,अभ्यास,वाचनालय,भरतकाम,विणकाम,किंवा इतर छंद ह्या सर्व गोष्टी करण्यात हे दिवस कापरासारखे कधी उडून गेले ते समजलेच नाही.

मग नोकरी लागली .त्यात प्रथम धारातीर्थी पडले ते खेळ आणि व्यायाम..!वाचन आणि इतर गोष्टीसाठी सुट्टीच्या दिवशी प्रयत्नपूर्वक वेळ काढावा लागे.पण नंतर नोकरी लग्न आणि संसार सुरु झाल्यावर "कोण होतीस तू,काय झालीस तू"असे म्हणायची वेळ आली.सर्व विसरून घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे पोटार्थी धावपळ सुरु झाली.मुलांचे अभ्यास,त्यांची शिक्षणे,त्यांचे प्रश्न ...!जीवन म्हणजे नुसती लढाई...!


आज आयुष्य एवढ्या बंधनाच्या चौकटीत अडकून पडलय कि त्यातून बाहेर पडायचा विचारही अंगावर शहारे उमठवतो , मार्ग खडतर झालेत ,पावलोपावली दुख माणसाची वाट बघतय ,माणूस हसण तर विसरूनच गेलाय जसा ,पणअसे म्हणतात ज्या माणसाने या दुःखाच्या मार्गाने प्रवास केलाय त्याला हसण्याची किमंत उमगलीये ,त्याला ठाऊक आहे हसण म्हणजे काय ते दुख विसरण्याची किल्ली आहे  ,क्रोधावरचा उत्तम उपाय म्हणजे हास्य ,सुखी आणि आनंदी जीवन जगण्याची कला म्हणजे हास्य आणि ज्या माणसाने पाऊलोपावली दुख भोगलीयेत तोच माणूस दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो कारण त्याला त्या निरागसपणे मनमुराद ,निखळ हास्याची खरी किमंत माहित असते . 
आपले दुःख जर आपण उगाळत बसलो तर कधी च आनंदी राहता येणार नाही . 
ही कविता मला खूप प्रेरणा देऊन जाते ,

जिंकण्याची जिद्द आहे
म्हणूनच आज वादळाशी झुंजते आहे
जगाला परत सामोरे जाताना 
नवीन जगण्याची उमेद आहे ||१||

जिंकण्याची जिद्द आहे
म्हणूनच सारे गंगाजळी वाहुनी
आकाश नवीन पेलण्यासाठी
सरसावले पुन्हा आज जीवनी ||२||

जिंकण्याची जिद्द आहे
म्हणूनच पुन्हा राखेतून जन्मायचे आहे
फिनिक्स पक्षाप्रमाणे
पुन्हा आज नव्याने भरारी घेयची आहे ||३||

जिंकण्याची जिद्द आहे
म्हणूनच देवास माझे सांगणे आहे
घे कितीही परीक्षा माझ्या
मी ह्या जीवनी जिंकणार आहे ||४||


हो मी नक्कीच जिंकणार आहे ,

हरले कधी नाही ,हरते आहे असे जाणवू दिले नाही मी माझ्या मनाला , नाही कुठे जाणवू दिले बाह्य जगाला ,

कारण चेहऱ्यावरच्या हास्यने च साथ दिली मला सर्वदा ,तसे च रहस्य फुलवण्याची ताकद राहो सर्वदा

असे च आज मनात आले ते लिहिले


अर्चना कुलकर्णी
१९/१२/२०१५

मुलगी

आज रिओ ऑलिंपिक मध्ये भारताने मिळवलेली पदके बघून सर्वानाच मुली च सहारा आहेत असे वाटू लागले आहे, हे हि नसे थोडके
मध्यमवर्गाचा आज चा विचार करता तिथे मुलीला कधी च दुय्यम दर्जा देणे सोडले आहे। योग्य शिक्षण, नोकरी जे काही शक्य असेल ते आई वडील करत असतात , पण लग्न झाल्यावर अजून हि किती जणींना तिच्या मनाजोगते काम / करियर करायची संधी मिळते ?
त्याकरिता घरच्यांचा किती पाठिंबा असतो ? तिच्या कामाबाबत आपुलकीने विचारपूस होते ?
ती तिच्याकरिता नोकरी करते असा च सूर आज ही ऐकायला मिळतो ना?
मग मुलगी झाली की आई ला च वाईट वाटते की अरे बाप रे  ही असे च आयुष्य घालवावे लागणार ?
ह्यात दोष कोणाचा ?
सासरी  सर्व व्यवस्थित करून जरी ती माहेर चे करत असली तरी ही  तिला दूषणे दिली जातात .

मग आज ची स्त्री घटस्फोटाचा विचार करू लागते , त्यात ही तिला च कमीपणा दिला जातो 

तिला ऍडजस्ट करता आले नाही ? 

काय बरोबर ना ?

मग कसली मुलगा मुलगी समानता ?


अर्चना कुलकर्णी

१०/१०/१६