माहेरवाशीण... पाहुणी
घर सगळे झाडून केले साफ
पावलं रेखली रांगोळीने छान !
रांगोळीच्या पावलात कुंकू न हळद,
उंबरठा धुवून वाहिले कुंकू लाल!
त्यावर ठेविले तांदळाचे माप
आज माहेरवाशीण येईल दारात !
दूध पाण्याने तिची नजर उतारू
प्रेमाने तिला साखर भरवू !
चंदनाची पावलं घरात रेखायची,
त्यावर मिरवत पाहुणी यायची !
औक्षणाने जागेवर बसवायची
नवीन साडी चोळी नेसवायची !
सोन्या मोत्याने सजवायची
लाडू, करंजीने पोट भरायची !
वर्षातून एकदा लेक घेरी आली
तिच्या पावली लक्ष्मी आली !
हसून स्वागताला उभ रहा
कंबर कसून सरबराई करा!
जेवायला करा गोडधोड पाच
एकवीस भाज्या अन वड्या पाच !
चटणी कोशिंबीरीने सजवावी डावी बाजू
पुरणपोळी, साजूक तुपाने व्हावी सुरुवात !
आग्रहाने खाऊ घालावे लेकीस
सावकाश जेवू दे एक एक घास !
पाहुणी अशी इथे रमून जायी
परि आपल्या घराची ओढ तिज राही !
दोन रात्री चा असे तिचा सहवास
मग जाईल परत आपल्या घरास !
कौतुक पाहून होई तिज संतोष
सुख समृद्धी चा देईल आशिष !
निघताना तिची पावले जड
आपलेही अंतःकरण जड !
पाहुणी माझी गौराई
होऊ कशी तुझी उतराई !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अर्चना कुलकर्णी.
25/08/2020