Sunday, 31 December 2017

आई तुला नाही विसरता येत.....

 


नाही विसरता येत..... 

 

बसले असता रिकामपणी 


दाटून येती साऱ्या आठवणी 


खेळ खेळले  खूप बालपणी 


विसरले का मी तुला तरुणपणी?  


खूपदा  वाटतं


 फोटोत जाऊन बसलेल्या 


आईशी निदान फोनवर बोलावं 


जमलं तर देवतांशी गोड  बोलून 


तिने परतूनच यावं 


तुझ्या  हातच काहीही 


मनसोक्त खावं !


सुगरण होतीस तू, 


कोणतीही गोष्ट 


नजरेच्या मापाने बनवायचीस 


तरी ही उत्कृष्ट च व्हायचे.... 


स्वयंपाक शिकून घे 


तू  सतत ओरडावं 


आणि मी मात्र 


ओट्यावर बसून 


आयतंच  खावं 


बाहेरून आल्यावर 


तिनेच समोर दिसावं 


थकली असशील ना म्हणून 


लगबगीने पाणी द्यावं 


आपण ही आल्या आल्या


 आज दिवसभरात घडलेलं 


सारं सारं सांगून टाकावं !


आई तू गेल्यापासून


खाण्या पिण्याची 


सणावाराची मजाच गेली 


आता मी नेहमीसारखी देवाची 


पूजा नाही करत 


आणि  उपास ही  नाही धरत !


किती बोलायचो आपण 


पण नंतर माझ्याच संसारात गेले बुडून 


आईशी बोलायलाही नव्हता  वेळ 


माहीतच नसतं आपल्याला 


नियती मांडून बसली आहे 


वेगळाच खेळ


मला तुझ्या देवाशी  भांडायचंय


सगळीकडे म्हणे देव नाही 


जाऊ शकत....


म्हणून बनवली आई! 


देवा तूच तिला नेण्याची


का केलीस घाई? 



आज ही तुझा फोटो 


पाहिला की 


काळजात उठते कळ खोल 


आज ही आनंद झाला की 


तुझीच आठवण काढत नाचते  


आज ही कुणी दुखावलं 


तर तुझ्या समोर रडते, 


चूक झाली तर तुझ्यापुढे 


येऊन कबूल करते, 


नवीन काही सुरु करताना 


नमस्कार करते, 


कारण तूच माझी देव होतीस 


आणि आहेस, 


फोटोत तुझे शब्द नाहीत 


तुझा स्पर्श नाही 


आई तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही, 


बघ ना जमेल तर 


बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून 


खरंच का ग एकदा 


गेलेली माणसं येत नाहीत परतून ?


पण मग असे का जावे टाकून? 


ठरवते काही असे कोण?  


तुझ्याशिवाय योग्य अयोग्य सांगेल कोण? 


खूप सारे प्रश्न आहेत, 


उत्तरे त्यास देईल कोण?  


आई तुला नाही विसरता येत.... ... 


अर्चना कुलकर्णी.

1/01/2018



Tuesday, 26 December 2017

शब्द

शब्द
 शब्द मनाला भिडतात, हसवतात ,रडवतात.
पण काही वेळेस शब्द आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतात.
आज सकाळी च जोक आला,

Which 3 words are better than "I Love You" ?
.
.
.
.
.
...。
"तू बारीक झालीस"

खरे तर वाचून हसणे अपेक्षित होते पण मला खूप वाईट वाटले आणि चक्क डोळ्यातून पाणी आले.
मी किती ही जाड झाले तरी बरेच दिवसांनी आई ला भेटले की आई म्हणे ,बारीक झालीयेस ग !
नाही ग , बारीक कशाने?
त्यावर ती म्हणे ,गाल बघ  खाली गेलेत ,
आणि पोट ? ते तर असणार च दोन मुलांचे ,घरचे करायचे तर एवढे शरीर पाहिजे च!
ह्या वर्षी तीच गेली .आता कोण म्हणणार प्रेमाने , तू बारीक झालीयेस !

Miss you Aai !
अर्चना
27/12/2017

Wednesday, 1 November 2017

श्री गजानन महाराज

*शेगावीच्या श्री गजानना*
*सदबुद्धी द्यावी या मना*
*आनंदघना श्री गजानना*
*सत्कार्यी लावा या मना*
*ब्रम्हांडनायका गजानना*
*दूर्बुद्धी नको देऊ या मना*
*पतीत पावना श्रीगजानना*
*सुखी ठेवा सर्व भक्तगणा*
*सतचिदानंदा श्रीगजानना*
*आनंदी ठेवा सर्व भक्तगणा*
*🌹🌹🌹

23/10/17

शनेश्वर

शनेश्वरा
आमची सर्व विघ्ने हारा
आले मी तुझिया दारा
दे मजसी तूंचि सहारा
सोसवेना हा भार  पसारा
तुझाच मम आसरा
अर्चना
5।6

Wednesday, 12 July 2017

हुरहूर

हुरहूर

का वाटते मनाला हुरहूर ? कधी वाटते , कधी अचानक शांत होते आपले मन !
थांगपत्ता आपल्या मनाचा आपल्याला च नसतो तर इतरांना कसा लागणार ?
क्षणात इथून तिथे धावणारे मन , असते कसे ते दिसत का नाही ?
मनातली अस्वस्थता फक्त आपल्याला च जाणवते की इतरांना जाणवते ?
जर ती आपण न बोलता दुसऱ्याला जाणवली तर ती दुसरी व्यक्ती आपली होऊन जाते, कशाने तर मनाने !

आहे की नाही गम्मत , जे दिसत च नाही पण आहे निश्चित त्या गोष्टीने आपण दुसऱ्याला बांधतो।
बरं , हे बांधलेले दिसते का तर ते ही नाही।

पण ही बांधलेली व्यक्ती जेव्हा अस्वस्थ होते तेव्हा आपल्या मनालाच प्रथम ते जाणवते।
Everything confusing !


अर्चना
30।4।2017

आई

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर , माझा पहिला गुरू हरपण्याची वेळ माझ्यावर आली।
आई या शब्दात सारे विश्व  सामावले असते. 
सुगरण, सुस्वभावी, हसतमुख , प्रेमळ,मुलांची  , नातवंडाची सतत काळजी वाहणारी माझी आई !
घर , स्वयंपाकघर हे च तिचे विश्व ! घरी आलेला पै पाहुणा, कामवाली , watchman, भाजीवाले, पोस्टमन , फळवाला  ह्यांना मायेने खायला घालणे हा तिचा स्वभाव ! वडील असेंस्तोवर त्यांना बाहेर फिरायची हौस , तिने घरात राहून सांभाळली ! परिस्थिती कशी ही असली तरी कोंड्याचा मांडा करणे तिला सहज शक्य होते .  मुलांनी शिकावे ह्याकरता ती आग्रही होती, मुली म्हणून आमच्यावर कधी वेगळी बंधने तिच्याकडून नव्हती, स्वतः ला सर्व गोष्टीत आवड होती , जसे की शिवणकाम , विणकाम , waste पासून बेस्ट बनवणे .रांगोळी वगैरे !
आई तुझ्याकडून मी काही ह्या कला  शिकून पारंगत झाले नाही.
पण तुझ्या कडून एक गोष्ट नक्की शिकले की कोणत्या ही परिस्थितीत हार मानायची नाही !
आई तुला सद्गती लाभो , ही च ईश्वर चरणी प्रार्थना !
तुझी अर्चना !
९/७/२०१७

प्रिय आई,

आज म्हणता म्हणता एक आठवडा झाला तू आमच्यातून जावून. तू गेल्या पासून एकही दिवस असा गेला नाही की तुझी आठवण झाली नाही. सतत तू बसून आमच्याशी बोलते आहेस असा भास होत राहतो. तुला कसला मोठा आजार नव्हता आणी तू एरव्ही पण झोपून कधी राहिली नाहीस. 
अतिश चे जाण्याचे तू कौतुक केले होतेस त्याच प्रमाणे
अदिती  ला जाताना सुध्दा तुला जमेल ते तू तिला करुन दिलेस. तेव्हा साधी पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती की तू सहा महिन्यांत आम्हाला सोडून जाशील.. नीता वहिनी गेली  तेव्हा तू तुझे दुःख बाजूला ठेवलेस आणि सर्वाना सावरायला मदत केलीस. कौस्तुभ च्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस, त्याचे शिक्षण उत्तम रीतीने पूर्ण व्हावे हे एक मिशन , हा च एक ध्यास .
आप्पा गेले  तेव्हा त्यांच्या जाण्याचे दुःख झालेच पण तू होतीस म्हणून त्यांची पोकळी तेवढी जाणवली नाही. पण आता तू गेल्याने मला सावरायला कुणी नाही. आणि जाणवले की आता मायेने डोक्यावर हात ठेवायला कुणी नाही. आपले छप्पर कायमचे गेले. तुझी मांडी नाही आता डोकं ठेवायला.
तुझे जेवण बनवणे म्हणजे खास च! कोणी ही एकदा खाल्ले तरी कायम लक्षात राहील असे ! प्रत्येक गोष्टीची पातेली ठरलेली. त्यात बदल केलेला तुला खपत नसे, अगदी चिमटा सुद्धा दुधाचा वेगळा ! नारळ खवुन ठेवायचा , भाजी आमटीत सढळ पणे घालायचे, आंबट पणाकरिता टोमॅटो , चिंच, कोकम कशात काय घालायचे हे अगदी योग्य ते !
कोणाचा वाढदिवस कधी आहे, ते आठवणीत ठेवून सांगणारी !
अश्या कितीतरी आठवणी मनात दाटून येतात. 

खरं आहे की माणूस जिवंत असताना आपण आपल्या भावना दाखवत नाही पण तुला न बोलताच सारे कळत होते. तू जरी देहाने नसलीस तरी तू कायमच आमच्यात असणार ह्याची खात्री आहे. आमच्या यशात आणि अपयशात आमच्या कायम पाठीशी राहशील. तुझे आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू देत. 

तुझी लेक
अर्चना 

15/7/17


आज आई ची खूप आठवण येते, तिची दीप पूजा ।
सगळे दिवे आदल्या रात्री काढून घासून पुसून स्वच्छ करून ठेवा, सकाळी त्यात तेल घालून वाती भिजवून ठेवा
मग सर्वांचे करून झाले की शेवटी पाटाभोवती रांगोळी काढून त्यावर ताट ठेवून त्यात सर्व दिवे प्रज्वलित करायचे।
हळद कुंकू फुले अक्षता वाहून दीप पूजन संपन्न होत असे,
नेवैद्य म्हणून गोड काही तरी बहुधा खीर च 
संध्याकाळी परत दीप प्रज्वलन , शुभम करोती म्हणायचे हे आई ची प्रथा !

अर्चना 
23/7/17
श्रावण महिना
संपूर्ण श्रावण महिना केवळ एक वेळेस जेवून कारायचीस, किती वर्षे केलेस , खरच लक्षात नई.
पण जेव्हा पासून लक्षात आहे , तेव्हा तुझे उपास हे च आठवते आहे.
खूप वर्षे अगदी कांदा लसूण सुद्धा आपण खात नसू श्रावणात.




Tuesday, 6 June 2017

ऑस्ट्रिया

*माझा प्रवास-ऑस्ट्रीया*

   आल्प्स पर्वतांच्या रांगामध्ये वसलेला ऑस्ट्रीया अतिशय शांत व सुंदर देश आहे.तेथील बर्फांच्या राशीमुळे स्कीइंग,स्केटिंग,स्नो बोर्डींग हे खेळ लोकप्रिय आहेत.इथली घरे,लाॅजेस,चर्चेस ह्यासाठी गाॅथिक पद्धतीचा वापर केला आहे.'इन्स्ब्रुक' हे ऑस्ट्रीयातील सर्वात सुंदर शहर आहे.तेथे दगडी रस्ते व प्राचीन दगडी इमारती आहेत.

    

     ज्याच्यामुळे ऑस्ट्रीयाला क्रिस्टल नगरी हे नाव पडले आहे.ते तेथील स्वारोस्कीचे क्रिस्टल म्युझियममुळे! १८९५ पासून डॅनियल स्वारोस्की यांनी क्रिस्टल म्हणजे स्फटिकापासून  सुंदर वस्तूंची निर्मिती करायला सुरुवात करायला सुरुवात केली.प्रवेशद्वारावर पाणी ओकणारा मोठा गवताचा चेहरा बनवला आहे.

     प्रदर्शनात स्फटिकांची झूल पांघरलेला घोडा,स्फटिकांनी लगडलेले झाड,रंगीबेरंगी फुलपांखरे,चमकदार पिरॅमिड,ज्वेलरीची हजारो डिझाइन्स,चित्ता,हरिण,मोर,झुंबरे इत्यादि प्रकार आहेत.११ मिटर लांबीची क्रिस्टलची भिंत बांधलेली असून त्यात १२ टन अनेक रंगाचे क्रिस्टल आहेत!!

Wednesday, 12 April 2017

पाऊस

पाऊस

पहिला पाऊस उधाणून आला 
मातीचा गंध नसानसात भिनला 
हळूच  मला खुणावू लागला 
चल सज्ज हो भिजायला 

२) 
वळवाचा पाऊस अन 
त्यात वेड्यासारखे भिजणे 
हरपलेले मन अन 
भान विसरून पाहणारा तो 
लाजणारी मी अन 
तगमगणारा तो ,
बावरलेलें मन ,
हळूच त्याच्या मिठीत 
सामावणारे तन !


अर्चना 
२०/६/२०१५

Sunday, 2 April 2017

माणूस

माणूस व प्राणी

शाम ला आई वडिलांनी  खूप लाडात वाढवले, नेहमी तो म्हणेल ते देत गेले. पण लग्नानंतर तो बदलला आई वडिलांशी नीट वागेना , घरी पैसे देत नसे, शेवटी आई बाबांनी त्याला वेगळे राहण्यास सांगितले , तो ही आपल्याला काही वस्तू हव्यात असे म्हणून घरातून कित्येक वस्तू घेऊन बाहेर पडला.
वर्षभरात बाबा आजारी झाले, त्याला बोलावून देखील तो आला नाही. उलट आता माझी गरज का? असे म्हणून बघत राहिला.सुदैवाने बाबांची पेन्शन होती, त्यामुळे योग्य उपचार मिळून ते बरे झाले.



सकाळीच आमच्या समोर च्या सोसायटी मधील काका आपल्या गावठी कुत्र्याला घेऊन बाहेर पडले.रस्त्यावर कडेला घेऊन त्याच्या मानेचा पट्टा काढला , म्हणाले जा आता तू. तो लाल्या त्यांच्याजवळ च पायापाशी घोटाळत उभा राहिला...
नाईलाजाने काकांनी दगड उचलला व हाड हाड  लाल्या करत त्याच्यावर भिरकावला.
पाळलेला कुत्रा त्याला का बरे हाकलले असावे असा मी विचार करत होते. तितक्यात काकांनी दुसरीकडे तोंड फिरवून जायला सुरुवात केली व एका मोठ्या दगडाला अडखळून पडले, दुसरे कोणी त्यांना उठवायला येण्याच्या आता लाल्या चपळपणे   आला, व त्यांचे सर्व अंग चाटू लागला, ते हि त्याच्या गळयात हात टाकून रडू लागले,

माणसातला इगो माणसा माणसात दुरावा निर्माण करतो आहे का ? 





अर्चना कुलकर्णी
2/4/17

मन

मनातले दु :ख सांगून हलके होते ,पण ते प्रत्येकाला व्यक्त करता  असे नाही . ते कोणाजवळ व्यक्त करावे या बाबतीत मनात साशंकता असते . जगी सर्व सुखी असा कोण आहे ? असे म्हटले जाते च , म्हणजे च प्रत्येकाला काही ना काही दुःख असते च . दुःख असणे आणि ते दाखवणे किंवा ते सहन  करणे हे प्रत्येकाचे वेगवेगळे असते . काही जण दुःख असताना खूप काळजीत /चिंतेत आहोत असे वारंवार बोलून दाखवतात , तर काही जण न बोलता सहन करतात . 
ज्यावेळेस दुःख हे शारीरिक असते तेव्हा ते सर्वाना दिसते , पण ते समजण्याची पातळी सर्वांची असते असे नाही ,त्यामुळे काही जण कोणाला न सांगता सहन करतात, शांतपणे निभावतात .  पण कधी अति जवळच्या माणसाचे शारीरिक आजार असतात , त्यावेळेस सहन करणे हे केवळ अशक्य होते , अशा ही परिस्थितीत धीराने उभे राहताना जवळ च्या माणसांनी समजून घेणे खूप आवश्यक असते . 
काही ना असे वाटते की आपले  दुःख  इतरांना सांगून त्याचा बाजार मांडू नये , पण नेमके त्याच वेळेस आपली माणसे विरुद्ध वागतात . मग होणार त्रागा , त्यामागची भावना समजून न घेता त्याच्यापासून दूर जातात . .आणि आर्थिक बाजू जर कमकुवत  असेल तर,व्यक्ती नुसती कमजोर होत  नाही तर ती अनेकदा लाचार होते . पण ऐकणारे कोणी नसते, त्यामुळे येणारे नैराश्य , मनाची कोंडी ...... 
अशा वेळेस एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्या साहाय्याला येते , न बोलता सर्व समजून घेते , आर्थिक मदतीची अपेक्षा नसते ,पण मानसिक साहाय्य खूप मोलाचे ठरते . आपल्याकरिता कोणी तरी आहे ही भावना त्याला दुःखातून तारून  न्यायला मदत करते ...
.  
काही जण कोणाला न सांगता आपल्या दुःखाचा सामना करतात .त्यातून बाहेर येतात
तेव्हा इतर  म्हणतात ,"अहो त्यांनी मदत नाही मागितली आम्ही नसती का केली?"

म्हणजे मदत मागितली तर तुम्ही करणार ? मग त्यात आपलेपणा कसा ? न मागता , न बोलता केलेली मदत ही मोलाची नव्हे का ? 
पुढे जाऊन मग म्हटले जाते की घरातल्या पेक्षा ह्यांना बाहेर चे जवळ चे वाटतात , 
त्यावेळेस काय वाटते ? 


अर्चना 

१/४/२०१६ 

Tuesday, 7 March 2017

महिला दिन...

 मी सामान्य, साधारण स्त्री 

अगदीच साधारण आहे मी, 

खुप काही विशेष नाही,

पण कोणीही येईल अन मला झटकुन जाईल,

इतकीही साधी नाही!

मला कुणाच्या पुढेही धावायचं नाही,

की कुणाच्या पाठीही जायचं नाही!!

पण एवढं मात्र नक्की,

हार मानुन, शस्त्र टाकुन, मागेही हटायचं नाही,


हर एक नातं मला फुलवायचंय,

मुलगी, बहीण, पत्नी, आई,

प्रत्येकच भुमिकेत मला शिरायचंय!

सगळीच नाती समरसुन जगायचीय,

सून म्हणून सासूचे करताना

मला आनंद मिळेल,

जर सासूने ते समजून घेतले तर,

त्यावेळेस मुलांचे चूक सांगता येईल का?

पुढे सासू बनून सुनेला समजून घ्यायचंय,

प्रत्येक नात्याला न्याय द्यायचाय!!

पण हे निभावताना त्यात हरवुन न जाता,

मला माझं स्वत्वं जपायचंय!!


कोणाला घडवण्याचे कार्य दिलंय

ते महान व्हावे ह्याकरिता

प्रयत्न करता करता 

इतर नाती जगता जगता,

मला माझं स्वतंत्र अस्तित्वं खुलवायचंय!

इतरांशी प्रामाणिक रहाताना,

स्वतःशीही प्रामाणिक रहायचंय!!

नात्यांवर प्रेम करता करता,

मला माझ्यावरही मनसोक्तं प्रेम करायचंय,


"स्त्रिशक्ती ", "समानता" मला माहीत नाही,

ह्यातुन ना मला काही सिद्ध करायचंय,

ना काही दाखवुन द्यायचंय!

"मीच" बरोबर, "तु" चुक हा अहं ना कुरवाळायचाय, ना "मी"पणा गाजवायचाय!!

पण माझ्या अस्मितेला सतत जागृत ठेवुन,

माझा मान मात्र मला राखायचाय!!


मी सगळ्या नात्यांना जोडुन ठेवेन,

माझी माझ्याशी जुळलेली नाळ मात्रं कापु नका!

माझी स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे,

ती पुसुन टाकु नका,

माझ्यापासुन मला पारखं करु नका!!

रुढी, परंपरा, बंधनं मलाही मान्य आहेत,

पण त्या नावानं माझ्या पायात बेड्या अडकवुन मला जखडुन ठेऊ नका!

वयाच्या प्रत्येक टप्प्यावर माझा नव्यानं जन्म होत असतो,

त्या प्रत्येक जन्माला समजुन घ्या अन मला माझं जगु द्या!!


माझी योग्यता माझ्या रुपात मोजु नका,

माझ्यातल्या शांततेला कमतरता समजु नका!

माझ्या रडण्याला असहाय्य समजु नका,

माझ्या "असण्याला" कुणी "संधी"ही समजु नका!!

वस्तु समजुन माझा बाजार करु नका,

गृहीत धरुन माझा अपमान करु नका,

नसेलही माझ्यात शारीरीक बळ,

पण, माझ्या मनाच्या ताकदीला आव्हान देऊ नका!!


मला कुणासमोर पदर पसरायचा नाही, 

की कुणासमोर पदर पाडायचाही नाही!!

ना मला "संतुर मम्मी" बनायचंय,

ना कुणाची "ड्रीम गर्ल"!!

माझी स्वप्नं खुप साधी आहेत, पण सोप्पीही नाहीत,

त्यांना प्रत्यक्षात आणायचंय,

त्यासाठी माझं बळ कैक पटीनं वाढवायचंय!!

आणि तेच बळ माझ्या पंखांना देऊन,

उंच उंच भरारी घेत स्वप्नांचं आकाश गवसायचंय!!


अर्चना