मदर्स डे, फादर्स डे हल्ली मुलं मोठ्या हौसेने साजरे करतात.
खूप आनंद होतो आपण उत्सवमूर्ती असतो तेव्हा.
पण अगदी खरं सांगायचं तर, मी स्वतःच्या संसारात मग्न असताना कोणालााही आईवडिलांची आठवण फारशी येतच नव्हती का?.. ! आपल्याच विश्वात आपण इतके बुडून गेलेले होते की दूर राहाणा-या आईवडिलांवर आपलं मनापासून प्रेम असलं, तरीही आपण त्यांच्या भावना जाणून घेऊ शकले नाही...त्यांना पुुरेेसा वेळ देऊ शकत नाही.... आपल्याला भेटण्यासाठी आसुसलेलं त्यांचं मन....आपला आवाज ऐकण्यासाठी आतुरलेले त्यांचे कान..यातलं काहीच आपल्या लक्षातही येत नाही...आणि ते जेव्हा कायमचे या दुनियेतून निघून जातात ना, तेव्हा आपल्याला त्यांचं महत्व कळतं...पण तेव्हा खूप उशीर होऊन गेलेला असतो...आधी त्यांनी मारलेल्या अबोल हाका,
दुनियेच्या कोलाहलात आपल्याला ऐकू येत नाहीत आणि आता ते आपल्या हाकांच्या
पल्याड निघून गेलेले असतात...!
आता आपल्याला त्यांची उणीव
अगदी मनापासून जाणवते आणि
वाटतं....गेले ते दिन गेले....!
आठवतंय मला-
मी दर आठवड्याला,
तुम्हा दोघांना भेटायला यायचे.
मला पाहून तुमचे अधू डोळे,
आनंदाने चमकायचे.
आठवडाभरात घडलेलं सारं,मी
तुम्हाला रंगवून रंगवून सांगायचे.
आईने आठवणीने आठवड्यात केलेला
विशेष खाऊ द्यायचा.
प्रत्येक वेळेस वेगळाच
मग अप्पानी विकत आणलेले फरसाण
किंवा शंकरपाळी..
माझ्या गप्पांनी तुम्ही खुलायचात,
आप्पाना माझ्या सोबतीने बाहेर जावे वाटे..
पण कधी कधी वेळेअभावी मी टाळत असे..
कधी महत्वाचे सल्लेही द्यायचात.
तासाभराने मी निघाले,
की तुम्ही नाराज व्हायचात.
' बस ना अजून थोडा वेळ ' ....
मला आग्रह करायचात .
मी जरा बसायचे ..
पुन्हा घराच्या ओढीने उठायचे..!
बसने घरी जाईस्तो उशीर होईल म्हणायचे
मग मला निरोप देण्यासाठी
तुमचं गॅलरीत येणं ,
मी दृष्टीआड होईपर्यंत .
हात हलवत उभे रहाणे
एकदा का तुम्ही नजरेआड झालात,की
माझ्या पावलांचा वेग वाढायचा.
माझा नवरा..... माझी मुलं
माझा संसार...स्वयंपाक
मला खुणावत असायचा
पुढच्याच क्षणी ,मी
माझ्या विश्वात गुरफटलेली.
तुमची अवघी दुनिया मात्र, जणू
माझ्यातच एकवटलेली..!
खरं तर माझ्याही हृदयात
तुम्हाला महत्वाचं स्थान होतं,
तुमच्या ''असण्याला "' खूप खूप
महत्त्व होतं...!
तरीही मी माझ्याच नादात
धावत राहिले,
तुमच्या नजरेतलं आर्जव,
दिसत असून नाकारत राहिले...
ज्यांनी मला जन्म दिला,
सक्षम अस्तित्व दिलं,त्यांचंच
अस्तित्व मी गृहित धरत राहिले.
हे काय हक्काचेच...!
आहेतच कधीही माझ्यासाठी !
ह्यांच्यासाठी वेगळे काही करावे
हे जाणवलेच नाही...
तुमच्यासाठीही मी तितकीच
' हक्काची' असले पाहिजे ,
हे सत्य मात्र सदैव
नजरेआड करत राहिले...!
तुम्हा दोघांच्या अचानक जाण्याने
हे सारं संपूनच गेलं---
आता कोणीच माझी आतुरतेने
वाट पाहात नाही,
आतुरत्या नजरेने माझं स्वागत
करत नाही.
मी निघाले की थांबायचा आग्रह
होत नाही,
जाताना मागे वळून पाहिलं
तर गॅलरीत कोणी दिसत नाही....
आता वाटतं......
पुन्हा ते दिवस यावेत
पुन्हा तुम्ही माझ्या वाटेकडे
डोळे लावावे,
मला पाहून तुमचे चेहरे
प्रसन्नतेने उजळावेत,
मला आग्रह करणारे दोन शब्द
कानांवर पडावेत....
आता तुमच्या हाकेला मी
लागलीच ओ देईन ग
आता तुम्ही म्हटलंत तर मी ,
अगदी नक्की थांबेन ग ......!
घरी परतायला उशीर होत असला ,तरीही....
माझी वेळेची गणितं, कोलमडत
असली , तरीही...
पण मला ठाऊक आहे आता हे कधीच घडणार नाही..
पण तुमची आठवण कधीच कमी होणार नाही....
अर्चना...
18/6/18