Sunday, 31 January 2021

आप्पा

🙏🙏🙏🙏🙏

आप्पा आज तुमचा सहावा स्मृतिदिन  त्यानिमित्त तुम्हाला  भावपूर्ण श्रद्धांजली 🙏  "शर पंजरी भीष्म..'आप्पा "  बघता बघता 6 वर्षें  झाली व   आज .एकेक आठवणी ताज्या होत आहेत...हा ही  अनुभव आहे…  आप्पा ची एकेक आठवण आठवतेय..    आप्पाना  सर्व गोष्टींची आवड होती.वाचन, संगीत ऐकणे,नाटक-सिनेमा बघणे, फिरणे, योग व लिखाण  सर्व गोष्टींची आवड होती… . तब्येतीने  ही एकदम फिट होते. शेवटपर्यंत  डायबेटीस,बी पी बिल्कुल आसपास ही फिरकले नाही त्यांच्या. वयाच्या 70 पर्यंत तरी औषधे कधी ही घेतली नाहीत त्यांनी. आप्पा ना  संगीताची गोडी होती ,म्हणून  रेडिओ transistor सोबत  कॅसेट त्यांच्याकडे होत्या.... त्यांना फोटो काढण्याचे विलक्षण वेड होते.त्याकाळी कॅमेरा घेऊन आमचे आणि सर्व मित्रांचे फोटो काढून,विविध अल्बम तयार केले होते ...आज त्याच आठवणी त्यांच्यामुळेच सर्वांकडे आहेत. प्रत्येक प्रसंगाला पत्र किंवा ग्रीटिंग पाठवायचेच.... आज ही माझ्याकडे जपून ठेवली आहेत.असे रसिक वडील मिळणे हे भाग्य च. त्यांनी  जीवनाचे अनेक चढउतार अनुभवले , अनेक समस्यांना तोंड दिले… आप्पा आणि पुस्तके हे एक समीकरणच होते,वाचनालय हे  विरंगुळ्याचे साधन, कायम त्यांच्याकडे एक तरी पुस्तक वाचत असायचे. वाढदिवसाला, बक्षीस  म्हणून  पुस्तक असायचेच...वाचन,लिखाणाची गोडी त्यांनीच मला लावली..त्यात आईचा ही मोठा हात होता,.... रोजनिशी लिहिणे आवडती गोष्ट त्यांची..  लिखाण बरेच केले त्यातले एक नाटक, एक कथासंग्रह, हिंदू धर्म थोडक्यात, अशी काही पुस्तके प्रकाशित केली...

अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाचे त्यांना कौतुक होते तसेच कोणतेही काम मनापासून करणारे त्यांच्या कौतुकास पात्र होत.. कधी लहान मोठा, श्रीमंत गरीब असा भेद न करता योग्य गोष्टीचे कौतुक करत... मित्रपरिवार मोठा होता..सर्वांशी बोलायला आवडत असे...

नवीन ठिकाणी फिरायला गेल्यावर, रात्री आपल्या रोजनीशीत तपशीलवार नोंद करून ठेवत....

डॉक्टरकडे जाणे त्यांना शिक्षा वाटे.. 

शेवटची एक दोन वर्षे काही ना काही कारणाने आजारी होत पण तरीही दवाखान्यात जायला तयार नसतं.....

शेवटी 15दिवस मात्र ICU मध्ये होते, आई म्हणे  "शरपंजरी भीष्म" असे झाले त्यांचे....कारण भीष्मदवादशी च्या दिवशी च ते आम्हाला सोडून गेले..

आयुष्यभर चांगले वागून शेवटी का असे व्हावे? असे प्रश्न निर्माण होतात..

ते अनुत्तरित च आहेत......🙏🙏

Thursday, 28 January 2021

मन मनास उमगत नाही

 मन मनास उमगत नाही....


मन माझे मला दिसत नाही

 पण ते कुठे ना कुठे जडवत राही,

क्षणोक्षणी भिरभीरत जाई

वाऱ्याहूनी चपळ पळत राही!


बालपण आठवता आठवता

पटकन वार्धक्यांच्या चिंतेत जायी

तारुण्याच्या आठवणीत जाता

मन मनाला उमगत नाही!


करू जाता कधी  प्रार्थना 

अपेक्षा करते हे वेडे मन

होते मग उगाच वंचना 

दुःखात बुडते ते हे मन!


जमिनीवर धावता धावता

नदीवर पोहायला जायी

विमानाने उडता उडता

मन मनास उमगत नाही!


अर्चना कुलकर्णी...

28/01/2021

Monday, 11 January 2021

पिंपळ पान

 पिंपळ पान


लालचुटुक रंगाचा

आला खूप बहर

निष्पर्ण पिंपळास

पान इवले बाकदार!


दिसामाजी बदलूनी रंग

लाल गुलाबी सोडुनी रंग

पोपटी ते गर्द हिरवा रंग

खुलवीतसे पिंपळाचे अंग!


रोज पाही मी त्यास निरखूनी

बाल्य सोडून येई यौवनी

सळसळ करत नाचे मनोमनी

जैसे की युवती गाती गाणी 


झाड वाढे माध्यान्हीस

वृक्ष उभा दिसें डेरेदार

सावली देवोनी पांथस्थस

शिकवी त्यास परोपकार!


कधी बसे तो ध्यानी

शिशिर ऋतूच्या सांयकाळी

होतसे का तो खिन्न मनी?

सुरु होत से पानगळी!


उचलोनी घेतो  कोणी

ते हिरवे पिंपळपान

वाटते त्याच  क्षणी

हाच का  प्रेमाचा मान?


अर्चना कुलकर्णी...


द्रोण रचना

पिंपळ पान


माझे पिंपळपान?

कुठे सापडेल 

ज्यात हे मन 

गुंतलेले,

प्रेमळ 

स्मृती

ती........


. अर्चना कुलकर्णी...


Friday, 8 January 2021

रोज च दूर जाशी

 रोजच जाशी दूर असा तू.....


मावळला दिनकर

पसरला अंधःकार

हरण्या तिमिर तो

येशी घेऊन प्रकाश!


मंद शीतल प्रकाश

 लावी वेड जनास 

प्रेमाची होई बरसात

हासे निंबोणीचे झाड!


चांदण्या फेर धरुनी

तुझ्या च संभोवती

आनंदाने लुकलूकती

दृश्य मनोहर गगनी!


पहाट होता पूर्व दिशी

भास्कर येई गगनी

रोजच दूर असा जाशी

मिटून जायी एक एक चांदणी!


रात्र होई प्रकाशी

वेड लावूनी अवनीशी

संबोधती तुज शशी 

परि रोज च तू दूर जाशी!


तव भेटीची सागरा ही असोशी!

चंदण्यात निघतो न्हाहोनी

त्यास कधी  तू विसरशी

फेसाळत तुज खुणावी!


कार्य तुझे ते अहोरात्र

शांततेत पूर्ण करिशी 

सर्वांस प्रेमे नादावूनी

रोज च तू दूर जाशी!

अर्चना कुलकर्णी.

Thursday, 7 January 2021

देखल्या देवा.,

 देखल्या देवा दंडवत......


खोट्याच्या दुनियेत

नेहमीच चाले

देखल्या देवा दंडवत!

असे मनी मी बोलें....


मी आहे स्पष्टवक्ती

मी नाही हो करत असले काही

तेवढ्यात दिसल्या सासूबाई

*अहो आई* म्हणत

केला की नमस्कार

लोकांसमोर  दिला थोडा मान

हा च की देखल्या देवा दंडवत!


आपले बरोबर असताना

का तुकवावी मान?

बॉस समोर मात्र

चुकीच्या गोष्टींना,

हो तुमचे बरोबर

म्हणत केलाच की

देखल्या देवा.....


चुकीचे वागली,

उगाच च भांडली

स्वतः च रुसून बसली

मैत्रीण हो माझी

केला तिला कॉल

माझे च घोडे अडले,थोडीशी रडली

झाले गेले विसरून पुन्हा लागू बोलू

देखल्या देवा घातला दंडवत!


येता  पालिकेची निवडणूक

येतील सारे हात जोडत

( देखल्या देवा आहे माहित )

मी आहे पक्के ठरवित

सांगेन रस्ता, कचरा सारे दुर्दैशेत

करा आहे सारे नीट

मग च मिळेल मत

खरेच जेव्हा आले दारीं,

सोबत ची पाहून जत्रा सारी,

मी म्हटले, हो सर्व  कार्याची

तुमच्यावर जबाबदारी

पेलताय तुम्ही खरोखरी

विजय तुमचाच ह्याची निश्चिती

(देखल्या देवा ह्याहून वेगळे काय?)

त्यांनी ही हसून म्हटले,

कुलकर्णी ताई, तुमच्या सारख्यामुळे

सांभाळली जाते जबाबदारी 😄



आले माझे च माझ्या लक्षात,

आज वर कित्येकांना केले

देखल्या देवा दंडवत....



अर्चना कुलकर्णी.

Monday, 4 January 2021

अपेक्षा

 ती....

आली जन्माला ती

असू दे मुलगी

पण गोरी आहे ना?

घरच्यांची अपेक्षा.....


पाठोपाठ भावंड आलं

सांभाळून घेईल ती त्याला

आई बोलली मनातलं

अपेक्षा डबल झाल्या....


अभ्यास, खेळ सर्वात हुशार,

घरकामात घेऊ नकोस माघार

आजी वदली तू च तर आधार

अपेक्षांचा होई गुणाकार


लग्न होऊन आली सासरी

नवऱ्याशी करू नकोस बरोबरी

घे तू  संसाराची जबाबदारी

अपेक्षा नाचती चौफेरी


मुलांच्या संगोपनाची जबाबदारी

निसर्गाने तिला च  दिली

तिने ही ती आनंदाने पेलली

स्वतः च्या अपेक्षा विसरली


आता ती वार्ध्यक्यात पोचली

सारी म्हणती सुखात जगली

सर्वांच्या अपेक्षाचे ओझं घेत जगली 

हे मात्र ती मनातच म्हणाली...



अर्चना कुलकर्णी...