Sunday, 25 February 2018

दुःख

श्रीदेवी च्या निधनाचे दुःख व्हावे ,इतकी मी तिची चाहती नाही.
तरिही मनाला चैन पडत नाही, याचे कारण 54 व्या वर्षी म्हणजे च आज च्या दृष्टीने खूप च अकाली मृत्यू !
तो ही अपघाती नाही तर हृदय विकाराने, कसली ही पूर्व सूचना न देता!
आयुष्य हे असे च आहे, आपण नेहमी उद्या असे करू, पुढील वर्षी करू म्हणतो , पण शाश्वती काय आपल्या पुढच्या श्वासाची अन आपण खूप काही ठरचतो.
ह्याच जाणिवेने मन उदास झाले आहे.
श्रीदेवी करिता खूप वाईट वाटले,तिच्या ही मुलीकडून अपेक्षा असतील ,त्या पूर्ण होतील किंवा नाही हे बघायला ती नाही.
तिचे आवडलेले चित्रपट म्हटले तर सदमा, जुदाई, mr इंडिया,लमहें, व इंग्लिश विंग्लिश

सदमा मधील अभिनय विशेष आवडलेला!
मनापासून श्रद्धांजली!
अर्चना
2

Friday, 2 February 2018

प्रिय आप्पा

प्रिय आप्पा,
तुम्हाला जाऊन आज 3 वर्षे झाली, पण एक ही दिवस असा गेला नाही की तुमची आठवण झाली नाही.
मी आज जे काही आहे, ते सर्व गुण तुमच्यातील आहेत असे मला वाटते.
वाचन, लिखाण , संभाषण ह्या तिन्ही गोष्टीत तुम्ही प्रवीण होतात , मी अजून ही प्रयत्न च करत असते.
चांगल्या गोष्टींना दाद देणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे, खूप मित्रपरिवार पण फक्त कौतुकाकरिता नाही तर पटले नाही तर वाद घालणे सर्व च गोष्टींची आठवण येते.
शुद्ध मराठी किंवा उत्तम इंग्लिश ही सुदधा तुमची खासियत !
आज देखील असे वाटते की आप्पा असे बोलले असते /असे वागले असते.
गेल्या आठवड्यात प्रदर्शन बघायला गेलं होते.
वेगवेगळ्या गावातून आलेल्या वेगवेगळ्या वस्तू /खाद्यपदार्थ विकायला होते.
कवठाची बर्फी घेताना तर खूप च आठवण झाली.
असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला खायची आवड होती, तर आई ला तयार करण्याची.
कसे केले असेल असे म्हणून स्वतः करायला बघायची.
टेंडर कोकोनट icecream तिने घरी बनवले ते बघून मी चाट झाले होते, त्यानंतर तिने जांभळाचे icecream देखील बनवले होते,
आप्पा तुम्ही इतक्या लवकर जाल असे वाटले च नव्हते, खूप काही बोलायचे होते .
तुम्हाला घेऊन खूप फिरायचे होते ते राहून च गेले.
माहीत नाही पुनर्जन्म असतो की नाही , पण असला च तर तुम्ही च माझे आई वडील असू द्या.
तुमच्या आधाराची गरज वाटते ,तेव्हा डोळ्यातले अश्रू अनावर होतात , पण त्यांना ही आवर घालायला शिकवलंय!
तुम्ही जरी दूर गेलात अदृश्य रूपाने जवळ च आहात असे च वाटते नेहमी !
आमच्या सुखासाठी नेहमी कष्टात राहिलात , पण नंतर हवे ते सुख काही दिले का तुम्हाला ?
मुलगी असली तरी जिद्द सोडायची नाही हे तुमचे सांगणे, पण मुलगी असल्यामुळे च दूर होते का तुमच्यापासून?
आयुष्यभर जिद्दीने जगलात,
15 दिवसांच्या लढाईनंतर  मृत्यूपूढे मात्र हात टेकले.
कधी कौतुकाची थाप पडली की मला तुमची उणीव जाणवते,
काळ हे औषध आहे ,असे म्हणतात ,पण सगळे विसरता येईल का ?
मला आठवणे शक्य नाही, पण आई ने अनेकदा सांगितलेले , ७व्या महिन्यापासून रांगत येऊन अप्पांच्या पानातील वरण भात खात असे,
पहिलीत असताना सकाळ ची शाळा तुम्ही सोडायला येत , कधी 10 पैशाचे गोल कॅडबरी तर कधी छोटे बटर (लोणी) ,पण शाळेला उशीर होतोय असे वाटले तर आधी धावत शाळेत जा, उद्या घेऊ असे सांगणे,
नंतर शाळेत जशा स्पर्ध्या असतील तशा प्रत्येकात भाग घे असे सांगणे.
वक्तृत्व स्पर्धेत , हस्ताक्षर स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद!
नेहमी मिळवत राहा असे म्हणणे सर्व सर्व मेमरी त फिट्ट आहे.
त्यामुळे असे विसरणे शक्य च नाही, कधी कधी जबाबदऱ्यांच्या ओझ्याखाली दूर ढकलल्या जातात, कधी त्या आठवणी च मार्ग दाखवतात.
मागे राहणारे पळ भर हाय हाय करणारे नसतात, काही जण आपली ही जखम आपल्यासोबत बाळगून असतात.ही पोकळी विसरू शकत नाही ,
आणि जाताना ह्या आठवणी घेऊन जातील.

आप्पा मला तुमची खूप आठवण येते.
😥
31/01/2018