आठवणीच्या झुल्यावर झुलताना
अनेकदा मी अनुभवलंय
पहिल्या प्रेमाच्या आठवणीत
पाय जमिनीवर ठरत च नाहीत ,
इंद्रधनुषी स्वप्नाला हात लावल्याखेरीज
झुला खाली येत च नाही .....l १ l
शाळेतल्या आठवणी तर अफाट आभाळासारख्या
कधी हळुवार पावसाने चिंब करून
मनाला सुखावतात
तर कधी धुव्वाधार कोसळून
आपले श्वास च गुदमरतात
मैत्रीच्या- द्वेषाच्या ह्या विविध रंगात
फुलपाखरागत हवेत च तरंगतात l 2l
नातातल्यांच्या आठवणी
महासागरागत खोल असतात ,
कधी संथ शांत असतात
आपणास संयमित करतात
तर कधी बेभान होवून
किनार्यावर आपटून घेणाऱ्या लाटेगत
आपलाच खेळ करत राहतात l ३ l
आठवणी ह्या फक्त आठवणीच असतात
कधी जागेपणी पाहिलेली गोड स्वप्ने असतात
तर कधी बोचरी होवून झोप ओरबाडून नेतात
न संपणारे रंग लेवून फिरतात अन फिरवतात
म्हणून च आठवणीशिवाय जगणे अशक्य करतात l ४ l
अर्चना ,ठाणे .9 -10 -12
