नाही विसरता येत.....
बसले असता रिकामपणी
दाटून येती साऱ्या आठवणी
खेळ खेळले खूप बालपणी
विसरले का मी तुला तरुणपणी?
खूपदा वाटतं
फोटोत जाऊन बसलेल्या
आईशी निदान फोनवर बोलावं
जमलं तर देवतांशी गोड बोलून
तिने परतूनच यावं
तुझ्या हातच काहीही
मनसोक्त खावं !
सुगरण होतीस तू,
कोणतीही गोष्ट
नजरेच्या मापाने बनवायचीस
तरी ही उत्कृष्ट च व्हायचे....
स्वयंपाक शिकून घे
तू सतत ओरडावं
आणि मी मात्र
ओट्यावर बसून
आयतंच खावं
बाहेरून आल्यावर
तिनेच समोर दिसावं
थकली असशील ना म्हणून
लगबगीने पाणी द्यावं
आपण ही आल्या आल्या
आज दिवसभरात घडलेलं
सारं सारं सांगून टाकावं !
आई तू गेल्यापासून
खाण्या पिण्याची
सणावाराची मजाच गेली
आता मी नेहमीसारखी देवाची
पूजा नाही करत
आणि उपास ही नाही धरत !
किती बोलायचो आपण
पण नंतर माझ्याच संसारात गेले बुडून
आईशी बोलायलाही नव्हता वेळ
माहीतच नसतं आपल्याला
नियती मांडून बसली आहे
वेगळाच खेळ
मला तुझ्या देवाशी भांडायचंय
सगळीकडे म्हणे देव नाही
जाऊ शकत....
म्हणून बनवली आई!
देवा तूच तिला नेण्याची
का केलीस घाई?
आज ही तुझा फोटो
पाहिला की
काळजात उठते कळ खोल
आज ही आनंद झाला की
तुझीच आठवण काढत नाचते
आज ही कुणी दुखावलं
तर तुझ्या समोर रडते,
चूक झाली तर तुझ्यापुढे
येऊन कबूल करते,
नवीन काही सुरु करताना
नमस्कार करते,
कारण तूच माझी देव होतीस
आणि आहेस,
फोटोत तुझे शब्द नाहीत
तुझा स्पर्श नाही
आई तुझ्याशिवाय कशालाच अर्थ नाही,
बघ ना जमेल तर
बोलता येईल का प्रत्यक्ष भरभरून
खरंच का ग एकदा
गेलेली माणसं येत नाहीत परतून ?
पण मग असे का जावे टाकून?
ठरवते काही असे कोण?
तुझ्याशिवाय योग्य अयोग्य सांगेल कोण?
खूप सारे प्रश्न आहेत,
उत्तरे त्यास देईल कोण?
आई तुला नाही विसरता येत.... ...
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment