गुन्हा...
आई अग काय झाले तुला?
दोन महिने तुझ्या सोबत खुशीत काढले
तू माझ्याशी बोलत होतीस,
होतीस खूप आनंदलेली,
कालपासून तुला काय होतय?
डॉक्टर काही बोलले,
बाबा, आजी तुला ओरडले
तू खूप घाबरलेली
अजून ही मी मात्र गोंधळलेली
नाळ माझी तुझ्याशी जोडलेली,
जाणवतय मला तू दुखावलेली,
मी मुलगी असणे हा गुन्हा का केला?
बाबांना माझा जन्म च नकोसा झाला!
आई तू कणखर होशील?
मला जग पाहू देशील?
खेळायचे आहे मला ताई बरोबर,
बोलायचे आहे,
आहे खूप शिकायचे,
आई, तू आहेस खंबीर
तू, मी अन ताई
करू निर्माण वेगळे जग
करतील सारे कौतुक मग
जिथे मुलगी होणे गुन्हा नसेल,
जन्मास मुलगी येणे आनंद असेल!
आई, कर ग माझी ही विनंती मान्य!
गर्भ पाडणे कर अमान्य!
सांग सार्यांना असा *गुन्हा* करणार नाही
तुझ्या सोबत मोठी होणार मी,
हे च स्वप्न माझे तू खरे करणार ना आई?
अर्चना कुलकर्णी....
No comments:
Post a Comment