Sunday, 11 July 2021

Pravas


             कधीचं ठरवलं होतं मी की माझ्या पहील्या विमान प्रवासाबद्दल लिहीन म्हणुन आज मुहुर्त उगवला 

               29 वर्षापूर्वी परदेशी प्रवास सगळ्यांनाच एक अप्रुप असायचं तेव्हा आजच्यासारखे खुपजण जात नसत परदेशात . त्यात मी एकटी जाणार ते पण जपानला म्हंटल्यावर आईबाबांच्या पोटात गोळाच आला होता कारण कधीच मला एकटीला त्यांनी कुठे पाठवलं नव्हतं . लग्नानंतर काही इलाज नव्हता . नितीन आधीच गेला होता . मला त्याने सगळं समजावुन सांगितलं होतं एअर पोर्टवर गेल्यापासुन विमानात बसेपर्यंत काय काय असतं ते . आणि तिथे उतरल्यावरपण काय असेल ते . मी जमेल तेवढं सगळं लक्षात ठेवलं होतं . आणि पॅकींग करत होते. जसे जसे जाण्याचे दिवस जवळ येत होते तशी एक अनामिक हुरहुर वाटत होती . एकीकडे नितीन भेटणार हा आनंद, कसं असेल टोकीयो ? ही उत्सुकता , आईबाबा सगळेच किमान ८/९ महीने तरी भेटणार नाही याचे दु:ख सगळंच एकत्र झालं होतं आणि मी भरारी घेण्यासाठी जय्यत तयारी करत होते. 

                डिसेंबरचाच महिना होता . ४ डिसेंबर उजाडली रात्री नऊचे माझे फ्लाईट होते तीन तास आधी एअर पोर्टला पोहोचायला हवे असे नितीनने सांगितले होते त्याप्रमाणे पोहोचलो. सगळ्यांचा निरोप घेउन मी चेकइन काउंटरकडे वळाले विंडो सिटसाठी त्यांना विनंती केली ती त्यांनी लगेच मान्य केली .formalities पार पडल्या बोर्डींग पास हातात आला किती वेळ तरी मी तो पहात होते मग सिक्युरिटी चेकइन करुन मी गेट शोधायला निघाले सगळ्या पाट्या बघत बघत गेटजवळ येउन पोहोचले . आता विमानात बसल्यावर कसं वाटेल याचे विचार मनात यायला लागले . बस लागते तसं विमान पण लागतं का असा एक प्रश्न पण मध्येच डोकावुन गेला एकुणच थोडी भांबावले होते मी अशातच बोर्डींग सुरु झाल्याची announcement झाली मी माझी पर्स छोटी बॅग सावरत उठले आणि गेटमधुन आत गेले माझ्या पहील्या वहील्या विमान प्रवासासाठी.

               मला विंडोसीट मिळाले होते . स्वत:भोवती बेल्ट बांधणे आणि सुरक्षतिततेच्या सगळ्या सुचना लक्षपूर्वक ऐकत होते . विमान झेपावण्यासाठी हळुहळु पुढे सरकत होतं मग थांबुन एकदम वेगात ते आकाशात झेपावण्यासाठी जसे निघाले तशी छातीतली धडधडपण तितक्याच वेगाने वाढली कानाला दडे बसले . थोड्यावेळाने विमानाबरोबरच मी पण शांत झाले. आता माझं बाहेर लक्ष गेलं चांदणं इतकं जवळुन कधीच पाहीलं नसल्याने त्यात मी हरवुन गेले होते मग हळुच ढगाआडुन चांदोबाने पण डोकावुन पाहीलं केवढा मोठ्ठा दिसत होता तो त्यावेळी मी एक लहान मुलगीच झाले होते कित्ती नवल वाटत होतं सगळ्याचं . ते ढगांचे पुंजके अगदी कापुस पिंजुन ठेवल्यासारखेच भासत होते. मग मात्र नंतर हे सगळं दिसेनासे झाले . भुकेची जाणीव होतच होती की हवाई सुंदरीने जेवण पुढे आणुन ठेवलं . जेवण झालं . दिवसभराच्या धावपळीने खरेतर खुप थकले होते पण निद्रादेवी काही केल्या प्रसन्न होईना . शेवटी तशीच डोळे मिटुन बसले . सकाळची चाहुल लागायला लागली होती म्हणुन शटर वर करुन बाहेर पाहीलं तर पहातच रहावं असं वाटलं रात्रीचा काळा कापुस आता तांबुस झाला होता सगळीकडे जणु गुलाल उधळावा असाच रंग दिसत होता खुप फ्रेश वाटलं दिवसभराचा थकवा , जागरण सगळं विसरले . Announcement झाली थोड्याच वेळात टोकीयोच्या नरीता  एअरपोर्टवर लॅंड होणार असल्याची आणि माझं धाबं दणांणलं . मला तिथे रिसिव करायला कुणीतरी येईल हे नितिनने सांगितलं होतं पण कुणी आलंच नाही तर ? या आणि अशा अनेक प्रश्नांनी मला घाबरवायला सुरवात केली होती . या गोंधळात मी कधी खाली आले हे कळालेच नाही . विमानातुन बाहेर आले एअर पोर्ट फार सुंदर होतं मी बेल्टजवळ पोहोचण्या आधीच माझं लगेज बेल्टवर आलं होतं . ते घेऊन मी बाहेर पडत असतांनाच नितीनच्या शिपच्या नावाचा बोर्ड मी पाहीला आणि जीव भांड्यात पडला तो एजंट मलाच घ्यायला आला होता . त्याला english येत नव्हतं आणि मला जपानी त्यामुळे बोलणं काहीच नव्हतं मी फक्तं त्याला फाॅलो करत होते . त्याने मला बसमध्ये बसवुन दिले आणि मला फक्त स्टेशनला जायचे आहे एवढेच कळाले . भांड्यात पडलेला जीव पुन्हा उडी मारुन वर आला. बस ड्रायव्हरने रेल्वेस्टेशनवर त्याला सांगितल्याप्रमाणे उतरवले पण मी उतरण्यापूर्वी तिथे मला घ्यायला दुसरा एजंट आला होता आणि त्याला थोडंस english बोलता येत होतं . मी धाडस करुन त्याला विचारलं where is ship ?where is my husband ? त्याने सांगितलं की शिप शिमिझुला आहे आणि तुम्हाला तिकडे जायचे आहे . असं म्हणुन त्याने सगळ्या स्टेशनची नावं असलेला कागद माझ्या हातात ठेवला . त्यात ईंग्लिश आणि जपानी मध्ये नावं लिहीलेली होती . तेव्हा बुलेट ट्रेन नविनच सुरु झाली होती . त्याने मला ट्रेनमध्ये बसवुन दिले आणि हे पण सांगितले की ट्रेन स्टेशनवर फक्त एकच मिनिट थांबते तेवढ्याच वेळात सामान घेउन उतरावे लागणार होते . पुन्हा टेन्शन . मी भारताबाहेर आले आहे याचा आनंद वगैरे काय असतो तो अजुन पर्यंत मला मिळाला नव्हता आणि नितीन भेटेपर्यंत तो मिळणारही नव्हता . ट्रेन खुप छान होती स्वच्छ होती . स्टेशनची नावं डिसप्ले होत होती पण त्यांच्या भाषेत आता काय असा प्रश्न पडलेला असतानांच एक आयडीया सुचली जपानी अक्षरं चित्रासारखीच असतात तसं बघायचं ठरवंलं आणि शिमिझु कसं लिहीलं आहे हे निरखुन पाहु लागले तसं अक्षर डिसप्ले झालं की उठायचं असं मनाशी ठरवलं . फ्रेश होण्यासाठी बाथरुम मध्ये गेले पण पाण्याचा पत्ता नाही म्हंटलं इथेही प्राॅब्लेम दिसतोय चुकुन नळाखालुन हात गेला तर चक्क पाणी आलं खुप मज्जा आली ४/५ वेळा असंच खेळत बसले मग स्टेशन आठवंलं बाहेर आले पुढचंच स्टेशन माझं होतं सगळं लगेज ढकलत दाराजवळ नेलं आणि ठरवलं की ट्रेन थांबली की सगळं खाली द्यायचं ढकलुन एक मिनिटात मी एवढच करु शकत होते. ट्रेन थांबली दार उघडलं आणि मी सामान ढकलणार तोच मला घ्यायला एजंट तिथे उभा होता त्याने सगळ लगेज घेतलं आणि निघाला तो पुढे मी मागे . तो खुप पुढे गेला मी मात्र मागेच राहीले कारण मला स्टेशनमधुन बाहेरच पडता येत नव्हतं सगळीकडे सेन्सर्स लावलेले पण एकाने मला तिकीट तिथे कसं स्कॅन करायचे ते दाखविले आणि मी बाहेर आले तोपर्यंत हा लगेज घेउन बराच पुढे आला होता मी त्याचा चेहेराही नीट पाहीला नव्हता . बाहेर आल्यावर जॅपनीज मध्ये एकाने मला गाडीत बसायला सांगितलं तशी खुणही केली मला वाटलं हाच आहे म्हणुन मी बसले आणि बसल्यावर चार पाच गाड्या सोडुन मला माझं लगेज दुसर्याच गाडीत ठेवलेलं दिसलं मी पटकन उतरले गाडीतुन आणि पळतच तिकडे गेले जिथे माझं लगेज होतं . दुपारचे दोन वाजले होते पण संध्याकाळ झाल्यासारखी वाटत होती . थंडी होती खुप . कार ने एक तासाचा प्रवास करुन मी पोर्टवर पोहोचले तेव्हा ३ वाजले हेते .  पण रात्र झाल्यासारखे वाटत होते . सकाळपासुन  बस , ट्रेन , कार असा प्रवास करत फायनली मी पोहेचले . मी जपान मध्ये पोहोचले ही जाणिव मला आता झाली होती मी जिंकले होते . नितीन  मला लांबुन दिसला आणि मनाच्या अंगणात मोर नाचायला लागले.............!!!❣️❣️❣️

©शिल्पा

#memories

No comments:

Post a Comment