झूल....
ती झाली तेंव्हा फक्त आई आनंदली
दीड वर्षात पाठीवर बाळी आली
मानात ताईपणाची रुजवाण झाली
तिच्यावर समजूतदारपणाची झूल पांघरली
पाठी अजून दोन भाऊ आले
ताई म्हणून ती मिरवत राहिली
समजूतदारपा बाणवत राहिली
तरी ही अभ्यासात चमकत राहिली
भावा बहिणींच्या मित्रांची ताई बनली
हट्ट करणे, हसून बोलणे विसरून गेली
साऱ्यांच्या चुका समजून घेतं राहिली
अचानक शाळा सोडून द्यायला लागली
अन कामाला लागली
मन बंड करे,
झूल द्यावी फेकून म्हणे,
पण काही दिवस सहन कर असे देखील म्हणे.....
सुरु झाला आता घरी लग्नाचा बाजार
बाबांना दिसत होता फक्त व्यवहार
पहिले स्थळ आले,
आला त्यांचा ही होकार
पटत होता साऱ्यांना हा व्यवहार,
सुशिक्षित होते घराणे
छान राहणे, बोलणे
तिने ही मग स्वप्ने बघण्यास केली सुरुवात
धाकटी सून होणार,
समजूतदारपणातून आता सुटका होणार
अजून काय हवे तिच्या मनाला?
लग्नातच आई कानात कुजबुजली
सून म्हणून जाते आहेस समजुतीने वाग
सासू च्या होत्या अपेक्षा फार
साऱ्यांचे करत साजरे करावे सणवार
नवरा तरी घेईल समजून
अपेक्षा आता फक्त तेवढीच होती,
धाकटा म्हणून तो लाडवलेला
बायको मिळाली हक्काची
तिलाच मर्जिप्रमाणे नाचवू लागला,
पुनः तीच झूल पांघरुन
नवा चेहरा उभा राहिला,
मुले, बाळे, पाहुणा रावळा
साऱ्यांचे तो चेहरा करत राहिला.....
हट्टी मनाला विझवत गेला....
स्वतः चे अस्तित्व विसरत गेला,
समजूतदारपणाची झूल मिरवत राहिला.....
अर्चना कुलकर्णी...
No comments:
Post a Comment