Monday, 5 August 2013

माझ्या मनातला पाऊस .




माझ्या मनातला पाऊस .
प्रत्येकाच्या मनात पाऊस अगदी लहानपणापासून असतो ,अगदी  "ये रे पावसा " ह्या गाण्यातून आपली पावसाशी ओळख होते .ती गट्टी मग आपल्यासोबत कायम राहते ….   मोठे झालो की पावसाची विविध रूपे मनात साठवत जातो ,म्हणून च कधी कोणाला आपणाला जास्त समजते असे सांगायचे असले की पटकन म्हणून जातो "तुझ्यापेक्षा मी चार पावसाळे जास्त पाहिले आहेत . ' रिमझिमणारा पाऊस , कोसळणारा पाऊस , गारांचा पाऊस , भुरभुरणारा पाऊस , बरसणारा पाऊस ….  बालपणीचा पाण्यात होड्या सोडणारा पाऊस , शाळेतून येताना रेनकोट विसरलो  म्हणून पाठीवरचे दप्तर डोक्यावर धरून मस्त मजेत बागडणारा पाऊस …. तर तरुणपणी बीच वर किंवा ट्रेक ला जावून मुद्दाम भिजण्याचा आणि भिजवण्याचा आनंद देणारा पाऊस ……
मी  वेगवेगळ्या भागातले पाऊस अनुभवले आहेत ,,,,,,, अगदी देश-विदेशातले …। आफ्रिकेत असताना वर्षातून दोन वेळा पावसाळा  ऋतू असे …. तर नाशिकमध्ये श्रावण -भाद्रपदात बरसणारा व लगेच थांबणारा पाऊस …. युरोप मध्ये पावसाबरोबर येणारी बोचरी थंडी देखील अनुभवली …।  तरी हि मनाला भावतो तो मुंबईचा पाऊस … आम्ही मुंबईकर एप्रिलपासूनच ७ जून ची वाट पहात असतो …. अजून दोन महिने आहेत …. आता एक च महिना उरला असे म्हणत उन्हाळ्याच्या त्रासातून सुटका होईल अशी वाट पाहतो …… मग  वृत्तपत्रात येवू लागते या वर्षी पावसाळा लवकर सुरु होईल … केरळला पावसाचे आगमन …. आहा मग आमचे पावसाचे आतुरतेने वाट पाहणे …. सगळे कसे अगदी ठरल्यासारखे …. मग हळूहळू आकाशात काळे ढग गोळा होणार …. धडाम धुडूम आवाज होणार आणि अगदी वाजत गाजत मुंबईत पावसाचे आगमन …ढग गोळा  व्हायला लागले की लगेचच स्कूटी बाहेर काढायची आणि पावसाची मजा लुटायला तयार … सुरुवातीला भुरभूर येणारा पाऊस  त्याचे थेंब गरम रस्त्यावर पडताच त्याची होणारी वाफ … रस्ता ओला  होईस्तोवर  … सुटणारा मातीचा सुगंध , झाडा- पानावर जमा होणारे पावसाचे थेंब …सुरुवातीला स्वच्छ होणारे रस्ते … नंतर …. रस्त्यावर साठून राहणारे पाणी … छत्री नसल्याने भिजणारी माणसे …. कोणी मुद्दाम पहिल्या पावसात भिजायला बाहेर पडलेले …. लगेच च कुठून तरी कणीस विकणारा येवून उभा राहतो …. मग गरमागरम कणीस त्यावर लिंबू तिखट लावून खायचे …कोणीतरी बातमी आणणार मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे बंद पडली आहे …. नेहमीचेच आहे … आता दोन तीन  दिवस तरी पाऊस मुक्काम हलवणार नाही …. हवेत गारवा आला का ? छे हा प्रश्न मनाला पडत नाही,........ घरी येवून मस्त पैकी गरमागरम कांदा भजी …. .....….
 उद्या मरीन  ड्राईव्ह ला जावू या की गेट वे ला असा विचार करत मैत्रीणीना फोन लावायचे …. दुसर्या दिवशी त्यापैकी एखाद्या ठिकाणी जावून लाटांचा उत्सव बघायचा …. हा पावसाचा आनंद पुढे वर्षभर मनात साठवायचा ….
 
 
 
पूर्व प्रसिद्धी - या सख्यानो ई -अंक जुने २०१३

No comments:

Post a Comment