Monday, 9 May 2016

माता दिन 2016

कालच्या  पोस्टवरून असे मनाला वाटून गेले , जेव्हा बाळ तान्हे असते तेव्हा त्याचे सर्व विश्व हे आई च असते  ,आईकरिता देखील ते च विश्व असते . 
पुढे त्याच्या विश्वात बाबा , भाऊ/ बहिण , आजी आजोबा , शेजारचे सामील होत जातात , मग मित्र मैत्रिणी , शिक्षक असे करत त्याचे (बाळाचे - मुलगा मुलगी दोन्ही) विश्व विस्तारत जाते . मग सहचर .त्याचा परिवार ,असे करत करत मग  स्वतः चे मुल करत विश्व   बदलत   जाते. त्या विश्वात आता मोठे झालेले ते च बाळ नकळतपणे आपल्या पहिल्या विश्वाला विसरून जाते . तिचे आपण काही करू शकत नाही अशी खंत असते काहीना पण बर्याच वेळेस शक्य असूनदेखील नाकारतात , मी देखील बर्याच वृद्धाश्रमांना  भेटी दिल्या आहेत . तिथले वृद्ध पाहून हे च जाणवते की खरोखर आज काल माणूस हा जास्त PRACTICAL होत आहे का ?  'कस्मे वादे ' करत तरुण वयात , निदान रडता तरी येते पण असे वृद्ध होवून एकाकी जिणे नकोसे होवून जाते . तिथे राहून आपल्या घरच्यांची वाट  पहात , मृत्यूची पण वाट पाहताना बघितले की मन खिन्न होते . म्हणून आज सकाळी व्ह्त्साप्प वर आलेला मेसेज जास्त पटतो , " काल जितके सोशल मिडिया वर "श्रावण बाळ " फिरत होते , त्यापैकी अर्धे जरी खर्या आयुष्यात असे असते तर  ८०% वृद्धाश्रम बंद झाले असते " 
अशीच एक कविता मी २०१२ मध्ये केली होती ती पुन्हा टाकते आहे ,


माता दिन म्हणुनी
लेकाचा फोन आला
विसरुनी मागचे सारे
आईला पाझर फुटला !
ऐकोनी शुभेच्छा सार्या
माता म्हणे त्याजला
तुला पाहोनी
बराच काळ लोटला !
शिकुनी घे तू
कॉम्पुटर चा मेळ सगळा
मग SKYPE  वरुनी
दाखवेन दुनिया सारी तुजला !
अरे पण एकदा
येवूनी जा बाळा
तव स्पर्शाकरिता
जीव हा आसुसला !
कामाचा हा सारा पसारा
त्यात नसे सुट्टीला थारा !
तिकीट धाडतोस का मजला ?
येवूनी भेटेन मी तुला !
पहातो मिळेल का विसा तुला
अन त्याने फोन ठेवला !
मग लेकीचा फोन वाजला
आई तुझ्या वर मी केली कविता
ऐक आधी ती आता
जागी सर्व श्रेष्ठ माझी माता
तिच्यावाचुनी जीवनात रिक्तता !
मातेस वाटे बहु धन्यता
कधी येतेस तू भेटायला ?
आता नको
खूप असेल न गावी उन्हाळा ?
मग मी येवू का मुंबईला ?
अग पाणी नाही नळाला
अन नणंद हि
येत असे  माहेरपणाला
भेटू आपण दिवाळीला !
आवरोनी भावनेचा उमाळा
हास्य आणोनी डोळा
म्हणतसे सुखी रहा तू बाळा !

अर्चना ....9/5/2016

No comments:

Post a Comment